37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात;पाच ठिकाणी होणार लसीकरण

१६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात;पाच ठिकाणी होणार लसीकरण

0
71

blank

वाशिम, दि. 12) : कोरोना या जागतिक महामारीवर प्रतिबंध करण्यासाठी कोरोनावर स्वदेशी लस उपलब्ध झाली आहे. देशपातळीवर कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी संशोधित केलेली लस प्रभावी ठरणार आहे. देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होत असतांना जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा आज, ११ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात घेतला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. संदीप हेडाऊ, एस. टी. आगार व्यवस्थापक वाशिम यांचे प्रतिनिधी, युनिसेफ कन्सलटंट डॉ. शैलेश पाटील, आरोग्य विभागाच्या श्रीमती एस. पी. चव्हाण, लसीकरण यंत्र संनियंत्रक संतोष इंगळे व मंगला लाटकर यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. म्हणाले, १६ जानेवारीपासून सुरु होणारी कोरोना लसीकरण मोहिम यशस्वी करा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि वीज वितरण कंपनीने आरोग्य यंत्रणेशी कोरोना लसीकरणासाठी योग्य समन्वय ठेवून लसीकरण मोहिम यशस्वी करावी. जिल्हयात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात यावे. ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नियमितपणे कोरोना चाचणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर म्हणाले की, येत्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला देशभर सुरुवात होत असल्यामुळे १७ जानेवारी रोजी सुरु होणारी राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिम पुढे ढकलण्यात आली आहे. पोलीओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने तयारी पूर्ण झाली आहे. कोविड-१९ लसीकरण मोहिम शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सुक्ष्म नियोजन व डाटा अपलोड केला आहे. १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु होत आहे. या टप्प्यात जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी आरोग्य अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे ५५०० जणांना ही लस देण्यात येणार असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगीतले.

कोरोना लसीकरणाबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण पुर्ण झाल्याचे सांगून डॉ. आहेर म्हणाले की, कोविन ॲपमध्ये एन्ट्री पुर्ण झाली आहे. लसीकरणाच्या वेळी लस घेणाऱ्याची पोर्टलवर एन्ट्री करण्यासाठी संबंधित व्यक्तीने पॅनकार्ड सोबत आणावे. तसेच आधारकार्ड सोबत आणावे. लसीकरणाच्या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण खोली, प्रतिक्षा खोली, देखरेख खोली अशी व्यवस्था करण्यात आली आहे. लस दिल्यानंतर लाभार्थ्याला ३० मिनिटे देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले.

blank