
गोंदिया,- येथील नवनिर्मिती प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम व सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला.12 जानेवारी रोजी प्रशासकीय इमारतीतील यहायक कामगार आयुक्त कार्यालय कक्षातील टाईल्सला पुन्हा तडे गेले. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम व सुरक्षेबद्दल प्रश्न निर्माण होत आहे.
नागरिकांसह प्रशासनाला सुविधेचे व्हावे यासाठी जिल्हास्थळ असलेल्या गोंदिया येथे सर्वच महत्वपूर्ण कार्यालय एकाच ठिकाणी यावे, यासाठी मध्यवर्ती ठिकाणी कोट्यवधींचा निधी खर्च करून प्रशस्त अशी प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली. मात्र, इमारत बांधकाम होत असतानाच इमारतीचा एक भाग कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाले होते. अखेरीस गत वर्षापासून या इमारतीतीत विविध विभागाचे कार्यालयाचे कामकाज या इमारतीतुन सुरु झाले आहे. मात्र इमारतीच्या सुरक्षा व बांधकामासंदर्भात नेहमीच चर्चा रंगतात. त्यात इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील कक्ष क्रमांक 35 मध्ये असलेल्या सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील टाईल्सला तडे जात आहे. विशेष म्हणजे, या कार्यालयात ज्या ठिकाणी टाईल्सला तडे गेले आहेत, तेथे ‘खतरा..थांबा…बाजुने चला’ असा फलकही लावण्याम आला आहे. याबाबतची माहिती 28 डिसेंबर रोजी पत्राद्वारे कामगार अधिकार्यांनी उपविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती. मात्र त्यांचे दुर्लक्ष झाल्याने आज, 12 जानेवारी कामगार अधिकारी कार्यालयातील टाईल्स मोठ्या आवाज होऊन तडकल्या. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्यांसह येथे येणार्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे एकूणच प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम व सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेे आहे.
तातडीने दुरुस्ती करण्यात येईल- खडतकर
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी अनिल खडतकर यांनी सांगितले, ही गंभीर बाब असून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना त्वरीत कळवून टाईल्सची दुरुस्ती करण्यात येईल. यासंदर्भात कामगार अधिकारी पंधरे यांनी सांगितले की, उपविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून माहिती देण्यात आली होती. मात्र अद्याप दुरुस्ती झाली नाही.




