
हातरुमालीने गळा आवळून केली हत्या
तुमसर :- संशय व संबंध जुडून प्रेम प्रकरणाचा त्रिकोण रंगतो व त्यातूनच गंभीर गुन्हे घडल्याचे प्रत्येक पोलीस डायरीवर नमुद आहेत. त्यातच मोहाडी तालुक्यातील हिवरा येथे प्रेम प्रकरणातून मित्रानेच मित्राचा कायमचा काटा काढल्याचा थरार घडला आहे. “पती-पत्नी और वो” याच धरतीवर हिवरा येथे घडलेल्या शित हत्याकांडात जिवास मुकलेल्या मृतकाचे नाव अमोल पंजाब चवळे(२६ राह.हिवरा) असून काटा काढणारा आरोपी मित्र राकेश सेवकराम मतारे(२६ राह.हिवरा) याला आंधळगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सदर थरार २३ जानेवारीला उघडकीस येताच गावात तणावाचे वातावरण आहे. मृतकाच्या पत्नीसोबत आरोपी फोनवर बोलन्याचे संशय अमोलच्या जिवावर बेतल्याचे पोलीस तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. मात्र बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविणा-या बापाला मुलाचे प्रेतच मिळाल्याने हिवरा परिसरात वातावरण शुन्य झाले आहे.
मोहाडी तालुक्यातील हिवरा येथिल रहिवासी मृतक अमोल चवळे हा वैवाहिक जिवनात सुखी होता. मात्र आपली पत्नी गावातीलच आरोपी राकेश मतारे याच्याशी विवाहबाह्य संबंधात असल्याचा संशय २० जानेवारीच्या रात्री शिगेला आला. त्यातून मृतकाचे व आरोपीचे भांडणही झाले होते. त्यातूनच बुधवारच्या रात्री आरोपीने मृतकाला गावातील बस स्थानकावर बोलविल्याची माहिती अमोलच्या भावाने पोलीस तक्रारीत सांगितले होते. २० जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता असलेल्या मृतकाचे प्रेत शनिवारच्या सकाळी हिवरा येथिल शेतशिवारातील विहिरीत आढळून आले. घटना उघडकीस येतात परिसरात एकच खळबळ माजली. आंधळगाव पोलीस घटनास्थळावर दाखल झाली व वस्तुस्थिती पाहताच पोलीसही दंग राहून गेली.
हिवरा येथिल रामप्रसाद लोंढे यांच्या शेतातील विहिरीत मृतक अमोलचे प्रेत हात-पाय तणसीच्या पेंढीने बाधंलेले व अंगावरील जॅकमध्ये सिमेंट काॅंक्रिटसह मुरुमाचे दगड बांधून असलेल्या अवस्थेत पोलीसांना आढळून आले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने अमोलची निर्घुन हत्या करण्यात आल्याचे पोलीसांनी तातडीच्या अहवालात नमुद केले आहे. त्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविणा-या वडिलांना अमोलचा शवच हाथी लागल्याने वडिलांनी घटनास्थळावर हंबरडा फोडला. मृतकाला त्याच्या भावाने केलेल्या शेवटच्या काॅलचा आधार घेत पोलीसांनी तपास सत्र राबवून गावातीलच आरोपी राकेश मतारे यालागीं ताब्यात घेतले. त्यातूनच पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने हातरुमालीने मृतकाचा गळा आवळून हत्या करुन पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सदर थरार रंगारुपास आनल्याचे कळलें आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी संतोषसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनात आंधळगाव पोलीसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३०२ व पुरावे नष्ट करण्याचे कलम २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र सदर थरार एकट्याने घडवणे व मृतकाला दगडांनी बांधून विहिरीत फेकणे यात संशयाची सुई फिरत आहे. सदर घटनेत एका पेक्षा जास्त आरोपी असल्याची चर्चा गावात केली जात आहे. मात्र त्याबाबत आंधळगाव पोलीसांनी तशी अधिकृत माहिती वृत्त लिहेपर्यंत प्रसार माध्यमांना दिलेली नाही. तर सदर घटनेचा तपास पोलीस निरिक्षक गणेश पडवार व सपोनी सुभाष बारसे करत आहेत.





