40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ खासदार सुनिल मेंढेंच्या पाठपुराव्याने फलित

खासदार सुनिल मेंढेंच्या पाठपुराव्याने फलित

0
92

भंडारा:  रेंगाळत असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामाच्या अनुषंगाने खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केलेल्या या लेखी स्वरूपाच्या तक्रारीचा आधार घेत आज दिल्ली येथे गोसीखुर्द आणि राज्यातील अन्य सिंचन प्रकल्पांच्या संदर्भात विस्तृत अशी बैठक घेण्यात आली.केंद्र आणि राज्यातील महत्त्वाचे मंत्री आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.गोसेखुर्दच्या अडवलेल्या निविदा प्रक्रिया ताबडतोब पूर्ण कराव्यात असे निर्देश केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.
खासदार सुनील मेंढे यांच्या मतदारसंघात असलेला गोसीखुर्द प्रकल्प विदर्भासाठी महत्त्वाकांक्षी असा आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रेंगाळत पडला आहे. सुरुवातीला असलेल्या 374 कोटीच्या या प्रकल्पाची किंमत आज 12000 कोटींच्या घरात गेली आहे. तरीही प्रकल्प अपूर्ण असल्याने दोन महिन्यांपूर्वी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करून प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली होती.या आधारे नागपूर येथे गोसीखुर्द प्रकल्पाच्या प्रमुख अधिकार्‍यांची बैठक नितीन गडकरी यांनी घेतली. होत असलेल्या विलंबाबद्दल  प्रचंड नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान याच अनुषंगाने आज दिल्ली येथे गडकरी यांच्या निवस्थानी बैठक घेतली गेली. या बैठकीत राज्यातील अन्य सिंचन प्रकल्पांचा आढावाही घेतला गेला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय जलसंधारण मंत्री गजेंद्र शेखावत, महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील मेंढे,  जलसंधारण विभागाचे केंद्रीय सचिव, महाराष्ट्राचे जलसिंचन विभागाचे सचिव, विदर्भ सिंचन विकास मंडळाचे व  गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
कित्येक वर्ष होऊन प्रकल्प पूर्ण होत नाही व किंमत वाढत असल्याने गडकरी यांनी खंत व्यक्त करून काम पूर्ण होण्यासाठी रेंगाळलेल्या सर्व निविदा प्रक्रिया पुढील एक महिन्यात पूर्ण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना गडकरी यांनी केल्या चे खासदार मेंढे यांनी सांगितले. प्रकल्प पुढील दोन वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.पुढील महिनाभऱ्यात अडचणी दूर करून टेंडर प्रक्रिया सुरू करू असे आश्वासन यावेळी राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी दिल्याचे खासदार म्हणाले. या अडचणी स्थानिक स्तरावर सोडवायचे आहे त्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि त्यांच्या विभागाचे सचिव नागपुरात येऊन त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही खासदारांनी यावेळी सांगितले.
या बैठकीच्या निमित्ताने गोसीखुर्द प्रकल्पाच्या पूर्णत्वा संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याने प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने गती येईल अशी आशा खासदार मेंढे यांनी व्यक्त केली आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने गोसीखुर्द प्रकल्पाच्या रखडलेल्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करीत विषय लावून धरल्याने दिल्ली येथील बैठक पूर्णत्वास गेली असे म्हणता येईल. या बैठकीमुळे गोसेच्या कामाला गती येऊन भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा मार्ग सुकर होईल अशी आशा करण्यास हरकत नाही.