
अर्जुनी/मोर.दि. 29:-तालुक्यातील पवनीधाबे ग्रामपंचायतिच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंचपदाची माळ महिलेच्या गळ्यात पडणार आहे. 28 रोजी अर्जुनी/मोर तालुक्यातील सर्वच 70 ही ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी जाहीर झालेल्या आरक्षणनुसार पवनीधाबेचे सरपंच पद अनुसूचित जाती महिला साठी राखीव झाले आहे. वॉर्ड क्र. 1 मधून सर्व साधारण महिला प्रवर्गातून श्रीमती पपीता नंदेश्वर यांनी हे गड काबीज केले आहे. परंतु त्या अनुसूचित जाती (महिला ) गटात मोडत असल्यामुळे त्यांची सरपंच पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. या ग्रामपंचायतीमध्य एकंदर 9 सदस्यांचा समावेश असून पैकी 5 महिला व 4 पुरुष सदस्य निवडून आले आहेत.
आपल्या गावचं सरपंच कोण होणार अशी येथील जनतेची उत्सुकता गेल्या 18 जानेवारी पासून शिगेला पोचली होती.हेच गाव नाहीतर सर्वच गावात आरक्षण सोडत कधी होणार या चर्चेला उधाण आलं होतं.आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे ह्याला पूर्णविराम लागलं आहे.
दरम्यान आता सरपंच पदासाठी 1 पेक्षा अधिक दावेदार असणाऱ्या गावात आपल्याच पानग्यावर विस्तव ओढण्यासाठी शर्यती सुरु झाल्या आहेत. दोन्ही विरुद्ध पॅनल मध्ये 1 सदस्य संख्या कमी अधिक असणाऱ्या सदस्यांना आपल्या गोटात आनन्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. तर पैसेवाले हे “बळी तो कानपिळी” किंवा “जिसकी लाठी उसकी भैंस” या म्हणींचा वापर करण्याच्या विचारात आहेत. आता फक्त वाट उरली आहे ती निवडणूक अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या तारखेची.





