38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ जिल्हा क्रीडा संकुलाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्हा क्रीडा संकुलाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

0
39

blank

वाशिम, दि. २9 : जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी विविध क्रीडा प्रकारातील चांगल्या सुविधा उपलब्ध करून देवून जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. या सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात सुरु असलेली सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. २६ जानेवारी रोजी नियोजन भवन येथील परिषद सभागृहात झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रशांत जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, क्रीडा संकुल परिसरात बांधण्यात येणारा पीपीपी प्रकल्प हा शासनाच्या नियम व मार्गदर्शक सूचनेनुसार तयार करण्यात यावा. हा प्रकल्प पूर्ण होताच जिल्हा क्रीडा संकुलाच्या उत्पन्नात भर पडेल. जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानमधून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग क्रीडा संकुलातील सुविधा आणि आवश्यक क्रीडा विषयक साहित्य खरेदी करण्यावर खर्च करावा. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्यामुळे जलतरण तलाव शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पुढील महिन्यापासून सुरु करावा. मातीतील कुस्ती हा क्रीडा प्रकार जिल्ह्यात सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. उप्पलवार यांनी जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाची, पीपीपी प्रकल्पाबाबत, जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा संकुलाच्या कामाबाबतची माहिती दिली. रिसोड येथे ४०० मीटर धावणपट्टी व विविध क्रीडाप्रकारांची मैदाने तयार करण्यात आली असून बहुद्देशीय सभागृहाचे काम बाकी आहे. मंगरूळपीर, मानोरा व मालेगाव येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये २०० मीटर धावणपट्टी आणि विविध क्रीडांगणे तयार झाली आहेत. वाशिम तालुका क्रीडा संकुल चिखली खुर्द येथे करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्याची माहिती दिली.

पालकमंत्री पाणंद रस्ते योजना, जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान नियामक परिषदेचा आढावा

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हास्तरीय पालकमंत्री पाणंद रस्ते योजना समिती व जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान नियामक परिषद समितीच्या कामकाजाचाही आढावा घेतला. जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठानच्या निधीतून आरोग्य, पाणीपुरवठा, पायाभूत भौतिक सुविधा निर्मितीच्या कामांना प्राधान्य द्यावे. तसेच ही सर्व कामे दर्जेदार होतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेचा आढावा घेवून पालकमंत्र्यांनी सदर कामांविषयी सूचना केल्या.

blank