- सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार, भावपूर्ण निरोप
- कृषि विभागातील राजेश बनचरे यांचाही सत्कार
वाशिम, दि. ३० : शासकीय सेवेमध्ये प्रवेश केल्यानंतर गेली ३६ वर्षे विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. या पदांवरून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची, त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, याचे समाधान वाटत असल्याची भावना वाशिमचे मावळते अपर जिल्हाधिकारी शरद पाटील यांनी व्यक्त केली. अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील व कृषि विभागातील राजेश बनचरे हे नियत वयोमानानुसार ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त नियोजन भवन येथे २९ जानेवारी रोजी आयोजित निरोप समारंभात सत्कारला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक तथा तहसीलदार प्रशांत जाधव, तहसीलदार शीतल वाणी-सोलट, वाशिमचे तहसीलदार विजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. मावळते अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांचे वडील पोपट पाटील, पत्नी स्मिता पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या व कृषि विभागाच्यावतीने श्री. पाटील व श्री. बनचरे यांचा सत्कार करण्यात आला.
श्री. पाटील म्हणाले, १९८४ मध्ये बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदावर पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून १९९७ मध्ये उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली. उपजिल्हाधिकारी म्हणून काम करीत असताना सरदार सरोवर प्रकल्प, यशदा, रुसा अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मे २०२० मध्ये वाशिम येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. या ३६ वर्षांच्या सेवेमध्ये लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. सर्वांच्या सहकार्याने काही चांगली कामे माझ्या हातून झाली, या कामांसाठी मी निमित्त ठरलो, याचे मला समाधान आहे. माझ्या संपूर्ण वाटचालीत आई-वडिलांचे संस्कार, पत्नी, कुटुंबियांचे सहकार्य याचा मोठा वाटा आहे. तसेच विविध पदांवर काम करतांना माझ्या सोबत काम करणाऱ्या सर्वांचे खूप चांगले सहकार्य लाभले, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
श्री. बनचरे म्हणाले, कृषि विभागात १९८५ पासून काम करीत असतांना अनेकांचे सहकार्य लाभले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली मार्गदर्शनामुळे आणि सर्वांच्या सहकार्याने चांगले काम करता आले. आपण आपले काम प्रामाणिकपणे केले, तर त्याची पावती नक्की मिळते, याचा अनुभव अनेकदा आला. प्रत्येकाने आपल्या कामावर निष्ठा ठेवून काम करावे, त्यामधून समाधान लाभते, असे त्यांनी सांगितले.
श्री. तोटावार म्हणाले, समोरच्या व्यक्तीला समजून घेणे हा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांचा स्वभाव होता. त्यामुळे एखादे काम घेवून त्यांच्याकडे गेल्यानंतर मनावर कधीही दडपण जाणवले नाही. अगदी हसतमुख राहून काम करण्याची त्यांची पद्धत सर्वांनी आत्मसात करण्यासारखी आहे. कृषि विभागाचे श्री. बनचरे यांनी सुद्धा अतिशय निष्ठापूर्वक आपली सेवा दिली. आपल्याकडे असलेल्या कामाशी संबंधित सर्व कागदपत्रे अतिशय सुंदरपद्धतीने ठेवणे, सुवाच्छ अक्षरात टिपण तयार करण्याच्या कामात ते निष्णात आहेत. लेखा विषयक कामकाजाची इत्थंभूत माहिती असल्याने त्यांचे खूप चांगले सहकार्य मिळाले, असे त्यांनी सांगितले.
श्री. हिंगे म्हणाले, अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आपुलकी बाळगून त्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. कोरोना संसर्गाच्या काळात त्यांनी सामान्य रूग्णालयाच्या स्वच्छतेचा विषय मार्गी लावण्यात तसेच आरटी-पीसीआर प्रयोगशाळेच्या उभारणीच्या कामात स्वतः पुढाकार घेवून काम केले. त्यामुळे हे दोन्ही विषय मार्गी लागण्यात खूप मदत झाली. अतिशय तत्त्वनिष्ठपणे काम करून लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी केलेले काम आदर्शवत ठरणारे आहे, असे त्यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांचे वडील पोपटराव पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुलाने केलेल्या चागंल्या कामामुळे आज आपलाही सन्मान होत आहे, याचा मला अभिमान वाटतो, असे सांगतांना ते अतिशय भावूक झाले. यावेळी त्यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. या आठवणी सांगताना त्यांना आपले आनंदाश्रू रोखता आले नाहीत, त्यामुळे काही काळासाठी संपूर्ण सभागृहातील वातावरण भावूक झाले होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. आहेर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. हवालदार, अपर जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक वैभव कुलकर्णी, जुनेद शेख, शारदा इंगळे, कृषि विभागातील डॉ. हुसेन यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.





