31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता ट्रैक्टर ट्रालीवरून पडल्याने मजूर युवकाचा मृत्यु

ट्रैक्टर ट्रालीवरून पडल्याने मजूर युवकाचा मृत्यु

0
53

कुरखेडा,दि.30ः तालुक्यातील सती नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करुन तिची वाहतूक करीत असताना ट्रॅक्टरच्या ट्रालीवरुन पडून एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे दीड वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील चिचटोला येथील नदीघाटावर घडली. निकेश सदाराम नैताम(२०) असे मृत मजुराचे नाव असून, तो नान्ही येथील रहिवासी आहे.

मागील वर्षभरापासून रेती घाटांची लिलाव प्रक्रिया न झाल्याने कुरखेडा तालुक्यात रेती तस्करीला ऊत आला आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी रेतीचा उपसा करुन वाहतूक केली जाते. त्यासाठी हमालांना मोठ्या प्रमाणात पैशाचे आमिष दाखविले जाते. प्रत्येक ट्रीपमागे त्यांना तिनशे रुपये दिले जातात, तर दुसरीकडे, एका ट्रिपमागे रेती तस्करांना २५०० रुपयांचा फायदा होतो. यातून अनेक जण मालामाल झाले आहेत. कुरखेडा तालुक्यात रेती तस्करांची मोठी टोळी सक्रिय असून, त्यांना काही राजकीय नेत्यांसह संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांचाही आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, एखादा गरजू नागरिक घरकामासाठी रेती आणण्यासाठी गेला, तर ट्रॅक्टरला पकडण्यासाठी तस्करांची हीच टोळी पुढाकार घेत असल्याची चर्चा आहे. आज मध्यरात्री चिचटोला येथील सती नदीच्या घाटावरुन रेतीचा उपसा करण्यात आला. त्यानंतर रेती ट्रॅक्टरद्वारे नेत असताना ट्रालीवरुन पडल्याने निकेश नैताम या युवकाचा मृत्यू झाला. निकेश हा लहानपणापासून नान्ही येथे आपल्या आजोबांकडे राहत होता. मोलमजुरी करुन तो आपला उदरनिर्वाह करीत होता. परंतु त्याला प्राण गमवावा लागला. या मजुराच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

blank