
तिरोडा मतदार संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद
तिरोडा–फक्त निवडणुकीपुरतेच संपर्कात न राहता कार्यकर्त्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे, जेणे करून कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनात आपली जागा बनविली पाहिजे. या कार्यशैलीमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज तळागळापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून बुथ कमिटी तयार करून कार्यकर्त्यांनी जनतेच्या समस्या मार्गी लावावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद दौरा निमित्त (ता.३०) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जिल्ह्यात आगमन झाले. दरम्यान तिरोडा येथे मतदार संघाच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधून याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यकर्त्यांनी लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली तर कसलीही तमा न बाळगता पुढे यावे, आंदोलन हे जनतेच्या मनात बिंबत असते. म्हणून आपण सत्तेत असोत की नसोत जनतेच्या कामासाठी पुढे येणे काही गैर नाही. गोंदिया जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडविण्याकरीता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, या जिल्ह्याला खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे खंबीर नेतृत्व लाभले आहे. त्याचप्रमाणे माजी आमदार राजेंद्र जैन हे देखील या जिल्ह्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असतात. गोंदिया जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पासंदर्भात त्यांनी अवगत करून दिले आहे. प्रलंबित प्रकल्पांना लवकरात लवकर पूर्णत्वास आणण्यासंदर्भात आपण पाऊल उचलणार आहोत. त्याचप्रमाणे काही प्रकल्पांना मंजुरी देण्यात येणार आहे. उद्या जलसिंचन विभागाची आढावा बैठक आहे. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा करून ते कसे मार्गी लागतील, यावर मार्ग काढणार आहोत. मात्र, पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी तळागळातील कार्यकर्ता मागे पडणार नाही, या बाबीची ग्वाही घ्यायला मी आपल्यापर्यंत पोहोचलो आहे. या जिल्ह्यात निवडणुका असल्यातरी राज्यभरात कुठलेही निवडणूक कार्यक्रम नाही. असे असले तरी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हे आपले कर्तव्य समजून परिवार संवाद दौरा हाती घेतला आहे. असेही ते म्हणाले. यावेळी मंचावर माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चन्द्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, रविकांत बोपचे, पंचम बिसेन, गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, केवल बघेले, प्रेम रहांगडाले, अजय गौर, ममता बैस, जगदीश बावणथडे, निता रहांगडाले, मनोज डोंगरे, कैलास पटले, निता राहंगडाले, डॉ. अविनाश जायसवाल, जिब्राहिल पठान, नरेश कुंभारे, प्रभु असाटी, वाय. टी. कटरे, आदी उपस्थित होते.





