
भंडारा,दि.04ःः ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहीजे. त्याकरिता जनगणना प्रपत्रात ओबीसींचा स्वतंत्र रकाना तयार करण्यात यावा, या व अन्य मागण्यांकरीता ओबीसींचे महाधरणे आंदोलन ६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे, अशी माहिती ओबीसी जनगणना परिषदेचे समन्वयक सदानंद इलमे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
स्वतंत्र भारतात सन १९३१ नंतर आजपर्यंत ओबीसींची जातिनिहाय जनगणना झालीच नाही. त्यामुळे सातत्याने ओबीसींवर अन्याय सुरुच आहे. ओबीसींची आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रगती रोखण्याचे कार्य सुरुच आहे. म्हणूनच आजपर्यंत ओबीसींच्या विशाल समाजाची जनगणना करण्यात आली नाही. कालेलकर आयोग, मंडल आयोग, स्वामीनाथन आयोग, नचिअप्पन समिती इत्यादी आयोग स्थापन करुन अंमलबजावणी न करता ओबीसींना केवळ गाजर दाखविण्याचेच कार्य केले आहे.
त्यामुळे ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहीजे, संविधानाच्या ३४0 व्या कलमाची अंमलबजावणी करावी, एस.सी., एस.टी. प्रमाणे ओबीसींना शासकीय सर्व योजनांचे लाभ मिळावे, ओबीसींना आरक्षणात असंवैधानिक लागलेली क्रिमीलेअरची अट रद्द झाली पाहीजे, ओबीसी विद्यार्थ्यांना १00 टक्के शिष्यवृत्ती मिळावी, ओबीसींना संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, ओबीसी कर्मचारी व अधिकारी यांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, सर्व मागासवर्गीय प्रवर्गातील एससी, एसटी, व्हिजे एनटी, एसबीसी, ओबीसी या प्रवर्गातील सर्व जमातीचे शासकीय नौकर्यांमध्ये असलेले आरक्षण व अनुशेष तातडीने भरण्यात यावा, या मागण्यांसाठी ओबीसी जनगणना परिषद जिल्हा भंडाराच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटनांद्वारे ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३0 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींचे महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
महाधरणे आंदोलनाच्या वेळी सर्व एससी, एसटी, व्हिजे एनटी, एसबीसी, ओबीसी कर्मचारी/ अधिकारी वर्ग, विद्यार्थी/विद्यार्थीनी, ओबीसीमधील सर्व जातीय समाजसंघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सदानंद इलमे, भगीरथ धोटे, पांडुरंग फुडे, मुरलीधर भरे, संजय आजबले, भैय्याजी लांबट, गोपाल सेलोकर, डॉ. बाळकृष्ण सार्वे, के. झेड. शेंडे,उमेश सिंगनजुडे, आनंदराव उरकुडे, गोपाल ठवकर, जयंत झोडे, डॉ. आशिष माटे, गोपाल देशमुख, रामलाल बोंदरे, ईश्वर निकुडे, मनोज बोरकर यांनी केले आहे.





