
वाशिम, दि. ०४ (जिमाका) : सन २०२० ते २०२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाकरिता महिला आरक्षण सोडत आज, ४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन इमारतीमध्ये झाली.या सोडतीद्वारे जिल्ह्यातील एकूण ४९० ग्रामपंचायतींपैकी २४६ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. यापैकी अनुसूचित जातीमधील महिलांसाठी ५०, अनुसूचित जमातीमधील महिलांसाठी २०, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ६६ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ११० ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित झाले आहे.
या आरक्षण सोडतीवेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर, तहसीलदार शीतल वाणी-सोलट, वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, रिसोडचे तहसीलदार अजित शेलार, कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे, मालेगावचे प्रभारी तहसीलदार रवी राठोड, मंगरूळपीर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सागर कुलकर्णी, मानोराचे नायब तहसीलदार श्री. किर्दक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
वाशिम तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाले असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी १०, अनुसूचित जमाती महिलांसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १९ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित झाले आहे. रिसोड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाले असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ९, अनुसूचित जमाती महिलांसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १८ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित झाले आहे.
मालेगाव तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाले असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ८, अनुसूचित जमाती महिलांसाठी ७, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १६ ठिकाणी आरक्षण निश्चित करण्यात आले. मंगरूळपीर तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींपैकी ३८ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ९, अनुसूचित जमाती महिलांसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी १० आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १७ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले.
कारंजा तालुक्यातील ९० पैकी ४५ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित राहणार असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ९, अनुसूचित जमाती महिलांसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी १२ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २२ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित झाले आहे. मानोरा तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींपैकी ३९ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित राहणार असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ५, अनुसूचित जमाती महिलांसाठी ५, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १८ ठिकाणी आरक्षण निश्चित झाले आहे.





