
सडक अर्जुनी:-तालुक्यात सप्टेंबर २०१८ मध्ये लिलाव झालेल्या वाळू घाटांची मुदत संपली असून आज दोन वर्ष तीन महिन्यांचा कालावधी होऊनसुद्धा जिल्ह्यात वाळूघाटांचे लिलाव झाले नाही.तरीही वाळू घाटावरून अवैध वाळू उपसा सुरू असून वाळू तस्करांचा धंदा जोरात सुरू आहे.
प्रशासन व लोकप्रतिनिधी लिलाव प्रकरणी गांभीर्य कां दाखवत नाही? यावर्षी काही वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया सुरू केली.पण कोणाच्या ईशा-यावर थंडबस्त्यात पडून आहे हे कळत नाही.जिल्ह्यातील सर्व वाळू घाटावर अवैध वाळू उपसा सुरू असून या घाटावर वाळू तस्करांनी ताबा घेतला आहे.यात पोलीस विभाग व महसूल विभाग बघ्याची भूमिका घेत आहेत.जिल्ह्यातील वाळू तस्करांनी तीनपट वाळू चे दर वाढविले असून खाजगी बांधकाम, शासकीय बांधकाम व व्यावसायिकांना विकत आहेत.अधिकृतपणे वाळू मिळत नसल्याने आता वाळू माफियांचे गांव तिथे दलाल तयार झाले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी वाळू ट्रॅक्टरमागे १००० रूपयांला मिळत होती ती वाळू आज ४००० ते ५००० रूपयांचा विकली जाते.आणि एक टिप्पर वाळू ८ ते १० हजार रुपयांला मिळत होते,ते टिप्पर आता २८ ते ३० हजार रुपयांला विकले जाते.एकीकडे वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले असले तरी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी,तिरोडा आणि जिल्ह्याच्या सिमेवरील सौंदड व भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील परसोडी या घाटावर जिल्हाधिकारी यांचे आदेश पायदळी तुडवीले जात आहे.
वरिष्ठांना कारवाई करीत असल्याचे सांगून ट्रॅक्टर वाल्यांवर कारवाई दाखवून वाळूचे टिप्पर महसूल यंत्रणेच्या जाळ्यातून सहीसलामत बाहेर पडत आहेत.सध्या वाळू माफियांनी चुलबंद नदी, वैनगंगा नदी,वाघनदी, येथील घाट वाळू माफियांच्या स्वाधीन असल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यातील वाळू माफिया या वाळू घाटावर कब्जा करून बसले आहेत.वाळू उपसावर बंदी असताना शासकीय व व्यवसायिक बांधकामावर वाळू येते कुठून याची साधी चौकशी महसूल यंत्रणेमार्फत केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आजघडीला सडक अर्जुनी तहसील कार्यालयासमोर शासकीय कंत्राटदार मातीमिश्रित वाळू चा वापर करून बांधकाम करीत असून सडक अर्जुनी जवळील डोंगरगाव,रेंगेपार येथील नाल्यातून ट्रॅक्टरने वाळू आणून तहसील कार्यालयासमोरील रोड व नाली च्या बांधकामावर टाकत आहे.पण तहसीलदार समोरून जात असतांनीसुद्धा सदर वाळू दररोज कुठून येते याची साधी चौकशी महसूल विभाग करीत नसेल तर अन्य ठिकाणी येत असलेल्या वाळूकडे कोण ढुंकून पाहणार.कंत्राटदार मिळेल त्या वाळूने थातुरमातुर पध्दतीने काम करून बिल उचलण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे कामाचा दर्जा घसरला आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्याचे ठिकाणी दररोज रात्री ला १०० टिप्पर वाळू आणली जाते.खुलेआम वाळूचे मोठमोठे ढिगारे साठवून ठेवलेले पाहून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जाते.सदर टिप्पर रात्री शहरात येतात त्यावेळेस गस्तीवर असलेले पोलीस या टिप्परवर कारवाई करण्याची हिंमत दाखवित कां नाही.तसेच मोरगाव अर्जुनी,सडक अर्जुनी तालुक्यातील नवेगावबांध ते कोहमारा या मार्गावर रोडाचे व नालीचे बांधकाम सुरू असून या बांधकामावर भंडारा जिल्ह्यातील दिघोरी,पालांदूर,चुलबद नदी सौंदड,परसोडी,सावंगी,कोहळीटोला,भदूटोला,शसीकरणनाला,वडेगाव,रेंगेपार,घाटबोरी येथून टिप्परने रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत नवेगावबांध येथील मिक्सर प्लांटमध्ये दररोज २५ते३०टिप्पर वाळू आणली जाते.ती कुठून येते,यांची साधी चौकशी महसूल विभाग करीत नाही.
माफियांवर कोणाचेही नियंत्रण नाही, छुप्या अजेंडाचा वापर:-> वाळू माफियांवर कोणाचेही नियंत्रण नसून सदर तस्करी लोकप्रतिनिधी व शासकीय पातळीवर मॅनेज असल्याचे सांगितले जाते.वाळू वाहतूक करण्याच्या वेळा ठरलेल्या असून त्या वेळेमध्ये त्या मार्गावर संबंधित महसुल विभाग व पोलीस विभाग फिरणार नाही असा छुपा करार वाळू माफिया वअधिका-यामध्ये झाल्याचे खुलेआम वाळू माफिया बोलत आहेत.यामध्ये वाळू माफिया पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालय पासून घाटापर्यंत वाळू माफियांचे मुखबीर तैनात केले असल्याने कोण अधिकारी कोठे जातो याची माहिती माफियांना पुरविली जाते.म्हणूनच अधिकारी गाढ झोपेत असताना त्यामागे साखर खाऊन बोथरी पांघरूण झोपले असल्याचे लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे.
_______ बी. बी. चुरहे





