33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी निधीचा उपयोग व्हावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी निधीचा उपयोग व्हावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

0
22

blank

वाशिम, दि. ०८ : राज्यातील मागास जिल्ह्यांमध्ये आकांक्षित जिल्हा म्हणून वाशिमचा समावेश आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचवावे आणि त्यांचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून देण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.

आज, ८ फेब्रुवारी रोजी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे वाशिम जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ च्या प्रारूप आराखडा बैठकीत श्री. पवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पवार म्हणाले की, जिल्ह्यातील कृषि विकासाला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून ५ कोटी ४४ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून वाशिम येथे बांधण्यात येणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्राची इमारत ही ग्रीन बिल्डींग असावी. यामध्ये हवा आणि प्रकाश चांगला असावा. एक उत्तम आणि दर्जेदार बांधकाम होईल, अशी ही इमारत असावी. त्यासाठी नव्याने इमारतीचा नकाशा तयार करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कोरोनाच्या काळात कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्याच्या दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी २८ कोटी रुपये निधी जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण करण्यात यावे. वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील विविध प्रकारच्या ग्राहकांची वीज बिलांची थकबाकी वसूल करावी. त्याच वसुलीतून मिळणारा पैसा हा त्याच जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या मुलभूत सुविधांच्या व ग्राहकांच्या विकासासाठी खर्च करण्यात यावा. जिल्हा वार्षिक योजनेत यंत्रणांना निधी देतांना जिल्हाधिकारी यांनी आता आय-पास प्रणालीकडे लक्ष द्यावे. या प्रणाली अंतर्गत अमरावती विभागात उत्तम कार्य करणाऱ्या एका जिल्ह्याला ५० कोटी रुपयांचा आव्हान निधी देण्यात येणार आहे. हा निधी वाशिम जिल्ह्याला मिळाला पाहिजे, यासाठी प्रशासनाने काम करावे, असे श्री. पवार म्हणाले.blank

वाशिम जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात असल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले, आकांक्षित जिल्ह्याचे सूत्र ठरवून जी रक्कम येते त्यामध्ये वाढ करून जिल्हा वार्षिक योजना निधीचा समावेश करून जिल्ह्याचा सन २०२१-२२ चा आराखडा १८५ कोटीचा निश्चित करण्यात आला आहे. हा आराखडा निश्चित करतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी जलजीवन मिशनचा निधी वळती  करून द्यावा किंवा अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत निधीची तरतूद करण्यात यावी.

आमदार अॅड. सरनाईक म्हणाले, वाशिम येथील स्मशानभूमीत विद्युत दाहिनीसाठी नगरपरिषदेने निधी मागणी केली आहे. त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, असे ते म्हणाले.आमदार श्री. झनक म्हणाले, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पावर जाणाऱ्या पोचमार्गांची दुरावस्था झाली आहे. त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करावी.

जिल्हा प्रारूप आराखडा सन  २०२१-२२ चे सादरीकरण आणि सन २०२०-२१ या वर्षात झालेल्या खर्चाची माहिती जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिली. या सभेला उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

blank