34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home शैक्षणिक नागपूर विद्यापीठाला दर्जेदार दीक्षांत सभागृह उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री

नागपूर विद्यापीठाला दर्जेदार दीक्षांत सभागृह उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री

0
22

blank

नागपूर दि, २६:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अत्याधुनिक व दर्जेदार दीक्षांत सभागृह उभारण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण अंबाझरी रोडवरील विद्यापीठ प्रशासकीय परिसरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यानंतर गुरुनानक भवन येथे झालेल्या समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध उद्योगपती बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष राहूल बजाज, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्र. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. दिनेशकुमार अग्रवाल उपस्थित होते.

राज्यातील इतर विद्यापीठात नसेल असे दीक्षांत सभागृह नागपूर विद्यापीठाने निर्माण करावे. या सभागृहाचा उपयोग विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यासोबतच समाजातील दर्जेदार संस्थाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा व्हावा. या विद्यापीठात मी दीक्षांत झालो आहे. या ऋणातून मुक्त होण्यासाठी सभागृह निर्मितीसाठी शासनाकडून जी मदत लागेल ती देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूर विद्यापीठाद्वारे बांधण्यात येणारी प्रशासकीय इमारत अतिशय सुंदर असावी. ग्रीन बिल्डींगची सर्व मानके या इमारतीला मिळावी. नागपूर हे वायफाय व स्मार्ट सिटी होत आहे. त्याच तोडीचे नागपूर विद्यापीठही व्हावे. प्रशासकीय ईमारत दोन वर्षात पूर्ण होऊन जेव्हा आपण या इमारतीत प्रवेश कराल, तेव्हा ती पुर्णपणे पेपरलेस झालेली असावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

सुप्रसिद्ध उद्योगपती राहूल बजाज यांनी महात्मा गांधी यांचे सोबत असलेल्या संबंधाचा उल्लेख करुन गांधीजींच्या विश्वस्त संकल्पनेशी बजाज कुंटूबियांची बांधिलकी असल्याचे सांगितले. या बांधिलकीतूनच विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत उभारणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम देण्यात येईल अशी घोषणा बजाज यांनी यावेळी केली. कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी आपल्या भाषणात नागपूर विद्यापीठाची ही प्रशासकीय इमारत येत्या दोन वर्षात पूर्ण होईल. ही इमारत अत्याधुनिक असेल असे स्पष्ट करुन नागपूर विद्यापीठाला अत्याधुनिक अशा दीक्षांत सभागृहाची शैक्षणिक कामाकरीता आवश्यक्ता आहे. आणि त्यासाठी प्रशासनाने मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी भाषणातून व्यक्त केली.

blank