
गोंदिया-दरवर्षीच्या शिक्षणाच्या कॅलेंडर प्रमाणे २६ जून पासूनच शाळा सुरु करण्यात यावी व १५ जून पासून शाळा सुरु करण्याचे आदेश शिक्षण विभागाने रद्द करावे व पुर्ववत २६ जून पासूनच शाळा सुरु करण्याची मागणी भारतीय कम्युनीस्ट पक्षाने केली आहे. याबाबद पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.मिलींद गणविर यांनी शालेय शिक्षणमंत्री व संबंधीत विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी विदर्भ विभागात २६ जून पासूनच शाळा सुरु करण्यात येत होत्या, याचे कारण की विदर्भात तापमानाची परिस्थीती पाहता २६ जून ही तारीख निश्चीत करण्यात येत होती व राज्याच्या उर्वरीत विभागात १५ जून पासून शाळा सुरु करण्यात येत होत्या. परंतु विदर्भाच्या ४० डीग्री सेल्सीयसच्या वर असलेल्या तापमानाच्या परिस्थीतीचा व याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा दुषपरिणाम न पाहता शिक्षण विभागाने सरसकट महाराष्ट्रात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचे आदेशीत केले आहे, हे तुघलकी आदेश शासनाने त्वरीत रद्द करुन पूर्ववत २६ जून पासूनच शाळा सुरु करण्याबद्दलची मागणी या विदर्भ विभागातील भारतीय कम्युनीस्ट पक्षासह पालक वर्ग करीत आहेत.





