
गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या तीन घरांचे कुलूप-कुंदे तोडून चोरी केलेल्या 2.10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व रामनगर पोलिसांनी जप्त केले आहेत. चार जणांना अटक करण्यात आली आहे. यात दोन दिल्ली येथील रहिवासी असून एक भंडारा व गोंदियाचा रहिवासी आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 22 जानेवारी रोजी कन्हारटोली येथील रामकृष्ण सत्संग मंडल परिसरातील रहिवासी हेमंतलाल लिल्हारे, आझाद वॉर्ड वसंतनगर येथील रहिवासी सविता उखरे तसेच 30 जानेवारी रोजी रिंग रोडवरील गाडगेनगर येथील रहिवासी अजय होशिलाप्रसाद मिश्रा यांच्या घरांचे कुलूप तोडून आलमारीत ठेवलेल्या दागिने व रोख रकमेवर अज्ञात चोरांनी हात साफ केले होते.
तिन्ही प्रकरणांत रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम 454, 380 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
![]() |
तिन्ही प्रकरणांत रामनगर पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने संयुक्त तपास सुरू केले. यात दिल्लीच्या शादीपूर डेपो वेस्ट पटेलनगर येथील रहिवासी अक्षयकुमार दिनेशकुमार गुप्ता (22), उमेशचंद्र उर्फ राहुल रमेशचंद्र मिश्रा (42), भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्याच्या शिवाजी वॉर्डातील रहिवासी अनिल चुन्नीलाल बोरकर (34) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यात तिन्ही आरोपींनी चोरीच्या घटना कबूल केल्या. तसेच चोरी केलेला माल गोंदियाच्या रामनगर येथील रहिवासी विजय प्रल्हाद दयानी याला विक्री केल्याचे सांगितले. यानंतर चारही जणांना अटक करण्यात आले. अटक तिन्ही आरोपींकडून चोरीचा 2.10 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलिसांद्वारे अधिक तपास केला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात रामनगरचे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, गुन्हे शाखेचे बबन आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद रघुवंशी, मधुकर सामलवार, तेजेंद्र मेश्राम, अभय शिंदे, लिलेंद्र बैस, गोपाल कापगते, चंद्रकांत करपे, राजू मिश्रा, राजेश बडे, तुलसीदास लुटे, महेश मेहर, इंद्रजीत बिसेन, मुरलीधर पांडे, साइबर सेलच्या वैशाली पाटील यांनी केली.





