गोंदिया,दि.16 : मूळ आस्थापनेवरील पद रिक्त असल्यास त्याचा प्रभार सोपविण्यात येतो. तो अल्पावधीकरिता असतो. परंतु, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात तब्बल दोन वर्षांपासून शिक्षणाधिकारी म्हणून डाएटचे व्याख्याता यांना प्रभार देण्यात आला आहे. प्रभारात त्यांच्या मूळ आस्थापनेवरील कामे खोळंबली. शिक्षण विभागात देखील आलबेल कारभार आहे. असे असताना देखील प्रभार सोडण्याचा मोह सुटता सुटेना अशी अवस्था झाली आहे. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष का जात नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.यासंदर्भात डायटचे प्राचार्य राजेश रुद्रकार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,व्याखाता राजकुमार हिवारे हे सबधित विभागाची कुठलीही परवानगी न घेता सरळ जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार सांभाळत आहेत.त्यांनी गेल्या दोन वर्षात व्याख्याते म्हणून कुठलेही प्रशिक्षणातील वर्ग घेतलेले नाहीत,यासंदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.आधीच प्रशिक्षण संस्थेच कर्मचारी अधिकारी वर्ग कमी असतांना मूळ आस्थापना सोडून इतर विभागाचा प्रभार सांभाळणे मूळ आस्थापनेसाठी योग्य नसल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणाधिकाऱ्यांविना आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांचे स्थानांतर झाल्याने शिक्षणाधिकारी पद रिक्त झाले होते. त्या पदाचा प्रभार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था( डाएट)चे व्याख्याता राजकुमार हिवारे यांना सोपविण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार त्यांच्याकडे आहे. कोणत्याही पदाचा प्रभार देताना त्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र त्या नियमांची शिक्षण विभागातच पायमल्ली होताना दिसत आहे. हल्ली कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर गेल्या. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा वचक नसल्यामुळे बिनधास्तपणे काम सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. अतिरिक्त प्रभार सांभाळत असताना मूळ पदाचा कार्यभार सांभाळूनच अतिरिक्त प्रभाराचा कार्यभार सांभाळता येते, असा शासन नियम आहे. मात्र मूळ पदाच्या कामांकडे दुर्लक्ष झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार देखील करण्यात आली असल्याची माहिती आहे. डाएटचे प्राचार्य यांनी अनेकदा त्यांना मूळ पदस्थापनेच्या कामांकडे लक्ष देण्याची आठवण करून दिली. मात्र त्याकडे देखील त्यांनी दुर्लक्ष केले. गतवर्षी बदली प्रक्रियेत अनेक ठिकाणी मर्जीने रिक्त पदाच्या वस्तुस्थितीत तफावत करून बदली प्रक्रियेच्या शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती, चटोपाध्यायमध्ये मर्जीने काम केल्याचा आरोप शिक्षक करत आहेत. गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार देताना देखील मोठा घोळ केला. निलंबन, विभागीय चौकशी, शाळा भेटी, तालुका स्तरावरील चौकशी, शिक्षकांना दमदाटी करणे, त्रास देणे असे प्रकार करत असल्याचाही आरोप शिक्षकांकडून होत आहे. शालेय साहित्य खरेदीत मोठा घोळ झाला असून चौकशी झाल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेले प्रदिपकुमार डांगे शिस्तप्रीय असल्याने त्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी होऊ लागली आहे.





