
वीजबिल न भरलेले कनेक्शन कापण्यास गेले होते
लाखनी,दि.१७.ः– थकबाकीदार वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यास गेलेल्या महावितरणच्या पथकास
चिडलेल्या ग्राहकाने कनिष्ठ अभियंता, श्री. मुकुल श्रीराम शेंडे यांना मारहाण केल्यामुळे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यावरून आरोपी ग्राहक सुनील लक्ष्मण बोरकर रा. रेंगेपार कोहळी, तालुका लाखणी याला अटक करण्यात आली .
रेंगेपार कोहळी, ता. लाखणी येथील सुनील लक्ष्मण बोरकर या वीज ग्राहकाने मागील 1 वर्षापासून वीज देयकाची रक्कम भरली नव्हती. या वीज ग्राहकाकडे ६ हजार ४६७ रुपयाची थकबाकी झाली होती. महावितरणकडून थकबाकीची रक्कम वसूल व्हावी यासाठी सतत पाठपुरावा सुरु होता. पण वीज ग्राहक सुनील लक्ष्मण बोरकर दाद देत नव्हता. महावितरणकडून थकबाकीची रक्कम न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची नोटिस अगोदर बजावण्यात आली होती.
शुक्रवार दि. १२.फेब्रुवारी रोजी महावितरणचे पिंपळगाव शाखा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता हे सहकर्मचार्यासह थकबाकीदार वीज ग्राहक सुनील लक्ष्मण बोरकर याचा वीज पुरवठा खंडित करण्यास गेल्यावर आरोपी ग्राहकाने कनिष्ठ अभियंता मुकुल श्रीराम शेंडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
वीज ग्राहकाच्या या कृत्याविरोधात महावितरणकडून लाखणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. लाखणी पोलिसांनी वीज ग्राहकाच्या विरोधात भादंवि ३५३,३५२,३२३,५०४,५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपी ग्राहक सुनील लक्ष्मण बोरकर याला अटक करण्यात आली असून आरोपीस अजूनही जामीन मिळालेला नाही. सदर घटनेत पोलिस विभागाचे व महावितरणच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचे मोलाचे सहकार्य लाभले.शासन हे महावितरण सोबत असून कुठलाही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी कुठलेही गैरकृत्य न करता तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण न करता थकीत असलेले वीजबिल भरण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.





