अर्जुनी मोरगाव नगरपंचायत मतदार यादीत प्रचंड घोळ

0
64

अर्जुनी मोरगाव : नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी शहरात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. अंतिम मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम सुरु आहे. मात्र सतराही प्रभागात मतदार याद्यांमधे प्रचंड घोळ निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आपआपल्या प्रभागातील मतदार याद्यांवर आक्षेप घेतला आहे. यामधे प्रभाग 9,10,11 मधे मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला असून या प्रभागातील मतदारांना इतरत्र प्रभागात समाविष्ट करुन मतदार पळवापळवीचे राजकारण सुरु असल्याचा आरोप प्रभाग दहाचे माजी नगरसेवक तथा नगरपंचायतचे भाजपा गटनेते देवेंद्र टेंभरे यांनी केला आहे. मतदार यादीत झालेला घोळ दुरुस्त करुन घोळ करणा-यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अर्जुनी मोरगाव नगरपंचायत हद्दीत 17 प्रभाग आहेत. विद्यमान नगरपंचायतच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला असून सध्या प्रशासक राज सुरु आहे. येत्या काही दिवसांत निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी मतदार याद्यांचे शुध्दीकरण करुन अद्यावत करण्याचे काम बिएलओना देण्यात आले होते. त्यामधे मृतकांचे नाव वगळणे, लग्न होऊन गेलेल्यांची नावे वगळने, नव्याने आलेले व अठरा वर्ष झालेल्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, प्रभाग बदलून गेलेल्यांची नावे शोधणे ही कामे गृहभेटीच्या माध्यमातून बिएलओना करायची होती. मात्र ही सर्व कामे घरी बसल्याच करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र ज्या प्रभागात जे लोक राहतात त्या मतदारांना इतर प्रभागातील मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याचे धाडस कुणी केले, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे देवेंद्र टेंभरे यांनी म्हटले आहे. तर अर्जुनी मोरगाव शहरातील जवळपासच्या गावातील लोकांचे नाव सुध्दा नगरपंचायतच्या मतदार यादीत आल्याच्या चर्चा शहरात आहेत. याचा अर्थ बोगस मतदारांचा शिरकाव तर झाला नाहीना, अशी शंका निर्माण झाली आहे.

या प्रकरणी काही सुज्ञ नागरिकांनी मतदार यादीवर हरकत घेऊन ही गंभीर बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली असल्याची माहिती आहे. शहरातील राजकीय वर्तुळात वजन असणारे मतदारयाद्यामधे घोळ करण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना? अशी शंका वर्तविण्यात येत आहे. काही इच्छुक उमेदवारांना मतदारयाद्यांचा अभ्यास करताना एका प्रभागातून दुस-या प्रभागात मतदार पळवापळवीची बाब निदर्शनास आली असल्याचे नागरिक सांगत आहेत. नगरपंचायतच्या अनेक प्रभागातील याद्यांमधे मतदारांची अदलाबदल झाल्याची बाब निदर्शनास आली असल्याचा आरोप टेंभरे यांनी केला आहे. राजकारणामध्ये तरबेज, अभ्यासू वृत्ती व खेळाडू वृत्ती असणा-या लोकांनी निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी नियोजन पुर्व मतदार यादीत नावे अदलाबदल केले असावे, असा आरोपही होत असल्याचे बोलले जात आहे.

अर्जुनी मोरगाव शहरातील सतराही प्रभागात काही प्रमाणात मतदारांची इतर प्रभागात अदलाबदल झाली असली तरी प्रभाग 16 व 9, 10 व 11 प्रभागात मोठ्या प्रमाणात अदलाबदल झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. प्रभाग क्रं. 10 मध्ये तर जवळपास शंभराच्या जवळपास मतदारांची नावे इतर प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र टेंभरे यांनी केला आहे. मतदार यादीत घोळ असल्याची बाब लक्षात आल्यावर टेंभरे यांनी लगेच नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष प्रभाग दहामध्ये नेवून चौकशी करण्यास सांगितले.

मतदार याद्यांमधे झालेला प्रचंड घोळ व अदलाबदल ही गंभीर बाब असून घोळ करणारे व ही यादी प्रकाशीत करणारे यांची चौकशी करुन दोषींना तडकाफडकी निलंबित करण्याची मागणी माजी नगरसेवक देवेंद्र टेंभरे यांनी केली आहे.