
भंडारा, दि. 23 : राज्यातील रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पादनाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरीता प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी तसेच सन 2021 मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांचे नाव नोंदणी करण्यासाठी 25 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राज्यात महारेशीम अभियान -2021 राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने महारेशीम अभियान भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
भंडारा जिल्ह्यातील सन 2021-22 मध्ये तुती रेशीम व टसर रेशीम उद्योगाकरीता नविन लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी विविध गावात सभा घेण्यात येणार आहे. त्याकरीता जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा यांचे कडून तुती व टसर रेशीम उद्योगाची माहिती देणारा रेशीम रथ तयार करण्यात आले आहे. या रेशीम रथाला मोहाडी तहसिलदार डी. सी. बोंबर्डे, नायब तहसिलदार एम. एम. हुकरे यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून महारेशीम-2021 अभियानाचे उद्घाटन (दि. 8) रोजी केले. यावेळी जिल्हा रेशीम कार्यालयातील कर्मचारी कु. एस. ए. लोणारे व आर. एम. लोहारे उपस्थित होते.
महारेशीम-2021 अभियान अंतर्गत जिल्ह्यातील किमान दहा ते पंधरा गावात सभा घेवून टसर व तुती रेशीम उद्योगाची माहिती देवून नोंदणी करण्यात येईल. आतापर्यंत मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव, कांद्री, पाहूनी, पवनी तालुक्यातील निष्टी, भूयार, मेंढेगांव, काकेपार भंडारा तालुक्यातील कोर्थूणा, गराडा बूज, बासोरा, खापा, लाखांदूर तालुक्यातील मांढळ, आसोला, मोहरणा, खैरणा येथे सभा घेण्यात आलेल्या आहे. तसेच तुती लागवड करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच ज्या गावाच्या परिसरात ऐन वृक्षाचे जंगल आहे. त्या गावातील गावकऱ्यांनी टसर रेशीम उद्योग करण्याकरीता जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा येथे संपर्क साधावा असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे.





