
गोंदिया–जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कंत्राटी कर्मचार्यांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन २४ फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यामुळे रोजगार हमी यंत्रणेने अंतर्गत येणारी विविध कामे प्रभावित होणार आहेत.
जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध विकासात्मक कामे केली जातात. यासाठी जिल्हा व पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित आहे. या यंत्रणेत १३८ कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. गत नोव्हेंबर महिन्यापासून या कर्मचार्यांना मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक विवंचनाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. तसेच मुदत संपूनही नवीन कराराला प्रशासनाने मान्यता दिली नाही. असे असूनही त्यांच्या कडून संबंधित विभाग कामे करून घेत आहे. बुधवार २४ फेब्रुवारी पासून सर्व १३८ कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत. यासंदर्भातील निवेदनही मग्रारोहयो कृती समितीच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.




