
कोल्हापूर : पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा सोमवार १ मार्चपर्यंत राजीनामा घ्यावा अन्यथा विधीमंडळाच्या सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचे रान उठवू’असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
स्वत:ला सत्यवादी समजणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याप्रकरणी आतापर्यंत गप्प का बसलेत ? असा सवालही पाटील यांनी केला. महाविकास आघाडीतील सहा मंत्र्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असताना त्यांच्यावर कुठल्याही स्वरुपाची कारवाई होत नाही असेही पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील हे शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. ‘पूजा चव्हाण प्रकरणी भाजपच्या चित्रा वाघ सातत्याने आवाज उठवित असल्यामुळे सरकारने त्यांच्या पतीवर कारवाई सुरू केली आहे. हे सरकार दडपशाहीने कामकाज करत आहे. हा प्रकार बिलकुल खपवून घेतला जाणार नाही’ असेही पाटील यांनी ठणकावले. चित्रा वाघ या वाघिण आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. भाजप कार्यकर्त्यांना त्रास देऊन घाबरवण्याचा प्रकार सहन करणार नाही. सरकारला तोंड उघडू देणार नाही असेही ते म्हणाले.
पूजा चव्हाण यांची हत्या की आत्महत्या या प्रकरणी सरकार अजून प्रकाशझोत टाकू शकले नाही. चव्हाण या मूळच्या बीडच्या असताना त्यांचा यवतमाळमध्ये गर्भपात कसा ? घटना घडली त्यावेळी उपस्थित असणारे ते दोघे कुठे गायब झाले आहेत. कुणाच्या सांगण्यावरुन गायब झाले ? डॉ. रोहिदास चव्हाण कुठे आहेत ? पोस्टमार्टम अहवाल कुठे आहे या साऱ्याचा सरकारने उलगडा करावा अशी मागणी पाटील यांनी केली.
सोमवारपासून आंदोलनाचे रान उठवून
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन सरकारने चौकशी करावी. यासाठी भारतीय जनता पक्षाने आंदोलन सुरू केले आहे. एखादा मंत्री ऐकत नसेल तर संबंधितांना मंत्रीमंडळातून काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारपर्यंत मंत्री राठोड यांचा राजीनामा घ्यावा. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या महिला आघाडीने शनिवारी १०० ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. सोमवारी, भाजप युवा आघाडीतर्फे शंभर ठिकाणी आंदोलन होणार आहे. बुधवारी, भाजपा ओबीसी सेलतर्फे १०० ठिकाणी आंदोलन होईल.’ सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणात भाजप तोंडघशी पडला अशी टीका विरोधक करत आहेत. याकडे लक्ष वेधल्यावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ‘भाजपवर अशी टीका करणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे.’असा टोला विरोधकांना लगाविला. पत्रकार परिषदेवेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, विजय अग्रवाल उपस्थित होते.
सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे यांनी समाजाला उत्तर द्यावे
पूजा चव्हाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेच्या नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याविषयावर बोलले पाहिजे. समाजाला उत्तर द्यावे असेही पाटील म्हणाले.
कोरोना कालावधीतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार
पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, वीज बिलाचा प्रश्न, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अशा विविध विषयावर सभागृहाला सरकारला घेरू असेही पाटील म्हणाले. कोरोना महामारीच्या कालावधीत झालेल्या वैद्यकीय साहित्य खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. सभागृहात त्याचा पर्दाफाश करू.’
सत्ता आली की मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देऊ
मराठा आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारला गांभीर्य नाही. वकिलांशी कुठल्याही स्वरुपात चर्चा नाही, सरकारकडून त्यांना योग्य त्या सूचना नाहीत.’असेही पाटील म्हणाले. ‘भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले की मराठा समाजाला आरक्षण देऊ. ते आरक्षण कायदेशीरदृष्ट्या टिकणारे असेल. आमच्या हाती काही जादूची कांडी नाही. पण योग्यपणे अभ्यास करुन टिकणारे आरक्षण देऊ.’अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.





