34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी नियोजन सभा

शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी नियोजन सभा

0
58

blank

तिरोडा, दि.4 : तालुकस्तरीय शाळाबाह्य, स्थलांतरित व अनुपस्थित बालकांचा शोध घेण्यासाठी तालुकस्तरीय समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीची ‘विशेष शोध मोहीम 2021’ ही शाळाबाह्य मुलांचा शोध घेणारी नियोजन सभा तहसीलदार प्रशांत घोरूडे यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेत 3 मार्च रोजी पार पडली.

या मोहिमेनुसार शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी, 3 ते 6 वर्षे वयोगटातील जी बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाहीत, खासगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे जूनियर केजी, सीनियर केजीमध्ये जात नाही तसेच 6 ते 18 वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालके यांची शोध मोहीम 5 ते 15 मार्च 2021 या कलावधीत राबविली जाणार आहे.

यात गावनिहाय सर्वेक्षण (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) प्रत्येक गावातील लोकसंख्येनुसार अंगणवाडी सेविका/मदतनीस, शिक्षक (प्राथमिक व माध्यमिक) हे प्रगणक म्हणून काम करणार आहेत. प्रगणकांना प्रपत्र अ ते ड ची माहिती देऊन (प्रशिक्षण) अंगणवाडी सेविका व शिक्षक यांच्याकडून एकत्रितपणे सर्वेक्षण केले जाणार आहे. एक विशेष दिवस म्हणून 9 मार्च 2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत संपूर्ण क्षेत्र प्रगणक, सर्वेक्षण नोडल अधिकारी (सरपंच, पोलीस पाटील, गावस्तर समिती) पिंजून काढून शाळाबाह्य बालकांचा शोध घेणार आहेत.
या ठिकाणी घेतला जाईल शोध, समित्या गठित

ही शोधमोहीम बसस्थानके, वीटभट्ट्या, शेत रोवणी करणारे मजूर, घरकुल बांधकाम करणारे मजूर, रेल्वे स्थानक, अस्थायी राहणारे कुटुंब, कचरा वेचणारी बालके, हॉटेल इत्यादि ठिकाणी काम करणारे बालमजूर आदींसाठी स्वतंत्र प्रगणक नेमलेले आहेत. त्यामुळे एकही बालक सर्वेक्षणातून सुटणार नाही, याबाबत खबरदारी या मोहिमेत घेण्यात येणार आहे. त्यासाठी विविध स्तरावर समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत. यात तालुकस्तर समिती, वॉर्डस्तर समिती, केंद्रस्तर समिती व गावस्तर समिती अशाप्रकारे तालुक्याच्या समित्या तयार करून नियोजन तयार केले आहे.

सदर सभेला तालुकास्तरीय समितीचे पदाधिकारी म्हणून तहसीलदार प्रशांत घोरूडे, एकात्मिक बालविकास अधिकारी विनोद चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शीतल मोहणे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रदीप नाकतोडे, शिक्षण विस्तार अधिकारी डी.बी. दिघोरे, तालुका बालरक्षक समन्वयक देवीदास हरडे, स्वयंसेवी संस्थेचे प्रतींनिधी नरेश शहारे, तालुका बालरक्षक प्रतींनिधी संतोष पारधी, अमोल डोंगरदिवे, राजू पालांदुरकर, प्रणय तांबे व सदस्य सचिव म्हणून गटशिक्षणाधिकारी एम.डी. पारधी उपस्थित होते.

blank