
भंडारा :- काॅ.शांताबाई महादेवराव बावनकर ही स्वतः चालतीबोलती पुस्तकच आहे असे मनोगत डॉ.प्रा.सुनील चवडे यांनी जागतिक महिला दिन व पुस्तक प्रकाशन समारंभात व्यक्त केले. भारतीय महिला फेडरेशन , प्रगतिशील लेखक संघ व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्चला राणा भवन भंडारा येथे जागतिक महिला दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी काॅ. रत्नाबाई इलमे होत्या तर महिला कार्यकर्त्या कॉम्रेड मीना देशपांडे व प्रा. चंदा अपराजित नागपुर ह्या प्रमुख पाहुण्या होत्या. मंचावर कॉम्रेड सदानंद इलमे व लेखिका कॉम्रेड प्रियकला मेश्राम,महिला फेडरेशन च्या अध्यक्षा काॅ.राणी कुंजेकर विराजमान होत्या .
कॉम्रेड हिवराज उके यांनी प्रास्ताविक केले. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या प्रणेत्या कॉम्रेड क्लारा झेटकिन व रोझा लुक्झेंबर्ग आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले .तसेच दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात शहीद झालेले शेतकरी, महिला फेडरेशनच्या नेत्या कॉम्रेड आशाताई कुकडे व न्यायमूर्ती पी. बी. सावंत इत्यादींना आदरांजली वाहण्यात आली.
जागतिक महिला दिना प्रसंगी ज्येष्ठ महिला नेत्या कॉम्रेड शांताबाई बावनकर यांचे लेखिका प्रियकला मेश्राम यांनी लिहिलेले” जीवन चरित्र- वाळवंटातील पाऊलवाट” या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना लेखिका प्रियाकला मेश्राम म्हणाल्या की कॉम्रेड शांताबाई बावनकर ह्या 86 वर्षाच्या असून त्या अजूनही गोरगरीब,दलित, पीडित, विधवा,परितक्त्या,निराधार, कामगार,शेतकरी, भूमिहीन, बेघरबार इत्यादींसाठी सतत कार्य करीत आहेत. त्या आयुर्वेदाचार्य डॉक्टर आहेत.त्या प्राचार्या म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्याआजीवन कम्युनिस्ट असून त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांना घडवले आहे.त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध सतत लढत असतात आणि तन-मन-धनाने नेहमीच गरजूंना मदत करीत असतात. त्यांनी आपले तुमसर येथील एक घर भारतीय कम्युनिस्ट पक्ष भंडारा जिल्हा कौंसिल ला पक्ष कार्यासाठी भेट म्हणून लिहून दिले आहे.
याप्रसंगी कॉम्रेड प्रियकला मेश्राम यांनी शांताबाई बावनकर यांना लाल साडी चोळी देऊन तसेच महिला फेडरेशन नागपूरच्या वतीने सुद्धा साडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.नागपूरच्या महिला कार्यकर्त्या प्राध्यापिका चंदा अपराजित यांनी जागतिक महिला दिनाचा इतिहास सांगितला व शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा समर्थन करणाऱ्या तरुणी दिशा रवी यांचे अभिनंदन केले व अनुसूचित जाती , भटक्या विमुक्त जमाती मुलींचे मानधन बंद केल्याबद्दल सरकारचा निषेध केला. त्याऐवजी मंत्री,आमदार, खासदार यांचे गडगंज वेतन भत्ते कमी करायला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
शांताबाई बद्दल बोलताना त्या म्हणाल्या की महिलांच्या जागतिक शांतता परिषदेसाठी त्या क्युबाला विदेशात जाऊन आल्या.मीनाताई देशपांडे म्हणाल्या बाजारीकरणाच्या अर्थव्यवस्थेने आपल्या नफ्यासाठी जागतिक महिला दिनाचा एवढा मोठा इव्हेंट करून ठेवला की सेलिब्रेशनच्या पलीकडे काहीच मिळत नाही. डोक्याला फेटे बांधून,बाईक रॅली काढून, पूजा करून न्याय मिळणार नाही तर तिला दमन व शोषणापासून मुक्त केले पाहिजे.
यावेळी उज्वला धांडे तुमसर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी काही ठराव पारित करण्यात आले व त्यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले. त्यात 1) कृषी कायद्या विरुद्ध लढणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा समर्थन,2) अनुसूचित जाती व भटक्या जमातीच्या मुलींना दिला जाणारा एक रुपया दैनिक भत्ता व 220 रुपये वार्षिक भत्ता बंद करण्यात आला तो परत सुरू करून त्यात वाढ करावी,3) विधानसभा व लोकसभेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळावे,4) महिलांना बलात्कार करून खून करणाऱ्या दोषी नराधमांना फाशी देण्यात यावी तसेच स्त्रियांवरील अन्याय अत्याचार व भेदभाव बंद करण्यात यावे.5) ज्यांना घरकुल नाहीत अशी बरीच नावे सुटली आहेत त्यासाठी पुनरसर्वेक्षण करून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा.6) घरगुती स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेल, वीज इत्यादी चे भरमसाठ वाढलेले दर कमी करण्यात यावे.7) पेन्शनधारकांवर अवलंबून असणाऱ्यांना केंद्राप्रमाणे राज्य सरकारांनी ते धोरण लागू करावे.8) 60 वर्षांवरील सर्व महिला पुरुषांना पेन्शन चा कायदा लागू करण्यात यावा.आणि निराधारांना दर महिन्याला पैसे देण्यात यावे. 9) महिला कामगारांना बांधकाम कामगार म्हणून भरलेले फॉर्म शुल्लक कारणासाठी परत केले जातात. कार्ड देण्यास खूप कालावधी लागतो त्यांना लाभापासून वंचित राहावे लागते त्यांना त्वरित प्रमाणपत्र देण्यात यावे.इत्यादीचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे संचालन कॉम्रेड हिवराज उके यांनी केले तर महिला फेडरेशनच्या सचिव काॅ.ममता तूरकर यांनी आभार मानले.
याप्रसंगी ठराविक महिला-पुरुष कोविड -19 चे नियम पाळून उपस्थित होते – त्यात प्रामुख्याने गजानन पाचे, वामनराव चांदेवार, महानंदा गजभिये सरस्वता देशमुख श्रीवंता अंबुले, रुखमा चोपकर,विजयकांता रामटेके,छबी पाचे, पत्रकार बाबा बाच्छील,सूभाष लिमजे,मानिका सतदेवे, उर्मिला वासनिक,विरांगणा पडोळे, कल्पना रामटेके, विजू वासनिक, मंगला बारापात्रे, हेमलता तिजारे, निर्मला माकडे, रत्नाकर मारवाडे, हरिदास जांगडे,गौतम भोयर मिताराम उके, नरेंद्र सुखदेवे, नंदकिशोर रामटेके, श्रीराम धुर्वे, महादेव आंबाघरे, गणेश चिचामे, शिवकुमार वाणी, ताराचंद देशमुख, डॉ. नीलेश देशपांडे, पुष्पा निंबारते, निशा रोडगे, दिलीप क्षीरसागर इत्यादींची उपस्थिती होती. शेवटी अल्पोपहाराने जागतिक महिला दिन समारंभाची सांगता करण्यात आली.





