
पुणे,दि.11- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाविरोधात एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले असून, पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहरातील नवी पेठ, शास्त्री रोड परिसरात ठिय्या आंदोलन केले आहे. परीक्षा रद्द केली जाऊ नये अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. यावेळी विद्यार्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे.
राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. या निर्णयानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पोलिस त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण विद्यार्थी मागे हटायला तयार नाहीत. राज्यसेवा पूर्ण परीक्षा आतापर्यंत पाच वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.
14 मार्च रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आली. आयोगाने त्या संबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी जारी केली आहे. आयोगाने दिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनच वेगवेगळ्या जिल्हयांनी निर्बंध लावलेले आहेत. प्रस्तुत परीक्षेची सुधारित तारीख जाहिर करण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांनी परिपत्रकात म्हटले आहे. या परीक्षेसाठी औरंगाबाद शहरातील 59 केंद्रावर 19 हजार 656 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापूर्वी देखील परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेतील करिअर करु पाहणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी वाट पहावी लागणार आहे.





