
( अनेक पिढ्यांपासुन उद्योग, लाखोची उलाढाल ) ( खस उद्योगाला कोरोणाचीही झळ )
अर्जुनी मोर./ सुरेंद्रकुमार ठवरे –तालुक्यातील बोंडगावदेवी व परिसरातील नागरीकांचा खसताट्या तयार करण्याचा प्रमुख व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र आता खस उपलब्ध होत नसल्याने नागरीकांचा हा व्यवसाय हळुहळु हिरावला जात आहे. त्यामुळे शहरवासींयाना गारवा देणा-या बोंडगाव देवी च्या खस उद्योगाला अखेरची घरघर लागली आहे.
तालुक्यातील बोंडगाव देवी हे गाव खसताट्या निर्मितीचे केंद्र आहे.या खस व्यवसायावर गावातील व परिसरातील शेकडो कुटुंबाचा रोजगाराचा व उदरनिर्वाहनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. हा व्यवसाय हंगामी व्यवसाय म्हणुन नावारुपाला आला आहे.अनुसूचित जातीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय म्हणुनही ओळखल्या जातो.पूर्वी या व्यवसायाला लागणारी खस अर्जुनी मोर तालुक्यातील ईटियाडोह धरणाच्या बुडीत क्षेत्रातुन काढली जायची.त्यासाठी पाटबंधारे विभागाचे माध्यमातून खस खोदण्याचा लिलाव होत होता.व शासनाला महशुल प्राप्त होत होता.कालांतराने हि लिलाव पध्दती प्रक्रिया बंद झाल्याने खस उद्योगाला अवकळा आली. ईटियाडोह धरणाच्या बुडीत क्षेत्रातील खस अत्यंत सुवासिक असल्याने या खसताट्या, कुलरताट्या व दरवाजा व खिडक्यांच्या खस पडद्यांची भारतभर मागणी होत होती. पूर्वी खस विक्रीचे केद्र नागपुर शहर होते.कालांतराने या खसताट्यांना छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश अशा अनेक राज्यात मागणी होत गेल्याने या खस व्यवसायाचे जाळे भारतभर पसरले.सध्या गोंदिया जिल्ह्यात खस खोदण्याचा लिलाव पध्दती बंद झाल्याने बोंडगाव देवी येथील खस व्यवसायीक आपला पारंपारिक उद्योग सुरु ठेवुन कुटुंबाचा चरीतार्थ चालविण्यासाठी झारखंड राज्यातील झारसुकडा परिसरातुन कच्चा माल खुली खस घेवुन आणतात.घरी आणल्यावर खस पाण्याने स्वच्छ धुवून बांबू, केन,व सुतळीच्या सहाय्याने कुलरताट्या,व दरवाजा खिडक्यांची पडदे तयार करतात. व भारतातील विभिन्न राज्यातील शहरात विक्री साठी नेतात.या व्यवसायात गावातील मजुरांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो.
सध्या संपूर्ण गावात कुलरताट्या व दरवाजा, खिडक्यांचे पडदे तयार झाले असुन भारताच्या विभिन्न राज्यातील शहरात विक्री साठी ट्रॅक ने नेने सुरु आहे. सध्या वुलवुडचा जमाना असला तरी वनस्पतीमुळापासुन निर्माण होणारी खस सुगंधीत व टिकावु असल्याने शहरी भागात बोंडगाव देवी येथील खसताट्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
भांडवल देण्यास बॅकांचा नकार
एकीकडे राज्यसरकार व केंद्रसरकार रोजगार निर्मितीसाठी ग्रामीण भागात कलाकौशल्य मेळावे आयोजित करुन रोजगार निर्मितीवर भर देत आहे. तर दुसरीकडे बोंडगाव देवी वासियांचा हंगामी व्यवसाय असुनही स्थानिक बॅंका व तालुक्यातील बॅंका कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी टाळाटाळ करतात. आजही बोंडगाव देवी वासियांचा खस व्यवसाय आर्थिक पाठबळाऐवजी हवा तसा आकार घेवु शकत नाही.अशी खंत खस व्यवसायीकांनी व्यक्त केली.
=खस उद्योगाला कोरोणाचीही झळ=
संपूर्ण जगासह भारतालाही हादरवुन सोडणा-या कोरोणा विषाणु मुळे उद्योगधंद्यावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. गेल्या वर्षभरापासुन अनेक उद्योग व व्यवसाय डबघाइस आले आहेत.मागील वर्षी 22 मार्च 2020 ला संपुर्ण देशात लाॅकडाऊन सुरु झाले.त्यामुळे खस उद्योगावरही मोठा विपरीत परिणाम झाला. मार्च महिन्यापासूनच हा उद्योग सुरु होत असल्याने व त्याचवेळी लाकडाऊन सुरु झाल्याने लाखो रुपयाचा खस चा माल परराज्यात जावु न शकल्याने तयार माल घरीच राहिल्याने खस व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावर्षी मोठी जोखीम उचलुन उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा असल्याने खस व्यवसायीकांनी तयार माल इतर राज्यात विक्रीसाठी नेले आहे.





