
गडचिरोली– जिल्हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असून जिल्ह्यातील गरीब आदिवासी नागरिकांच्या दुर्धर आजारावर उपचारासाठी आदिवासीबहूल क्षेत्र असलेल्या गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज मंजूर करून आरोग्याच्या सोयी -सुविधा प्रशस्त करण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत केली.
देशातील मागास व आदिवासी क्षेत्रातील मलेरियासारख्या दुर्धर आजारांच्या उपाययोजने संबंधीच्या तारांकित प्रश्न संख्या ३४४ वर चर्चा करताना खासदार अशोक नेते यांनी अतिदुर्गम, आदिवासीबहूल, अतिमागास, नक्षल पीडित गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातील अपुर्या आरोग्य सुविधांची विदारक स्थिती विषद केली.
गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातील गरीब, आदिवासी नागरिकांसाठी मलेरिया, कॅन्सर, हृदयरोग, किडनी, लिव्हर, हॅपाटायटीस-बी इत्यादी दुर्धर आजारावर योग्य उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा जिल्ह्यात उपलब्ध नाही. त्यामुळे या रोगांच्या उपचारासाठी गरीब नागरिकांना नागपूर येथे जावे लागते. मात्र, नागरिकांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने त्यांना नागपूर येथे जाऊन उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. ही बाब गंभीर असून शासनाने या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठोस उपाययोजना तथा उचित निर्णय घेण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी १९ मार्च रोजी तारांकित प्रश्न दरम्यान लोकसभेत केली व आरोग्याच्या या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
या प्रश्नांवर लोकसभेत उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ (भाजपा) चे सरकार संपूर्ण देशभरात आरोग्य सुविधांवर विशेष भर देत आहे. मोदी यांच्या नेतृत्वातील देशातील हे पहिले सरकार आहे, ज्यांनी वैज्ञानिक पद्धतीने सर्व्हेक्षण करुन पायाभूत सुविधा नसलेले देशातील ११२ जिल्हे आकांक्षीत घोषित करून एनएचएमच्या माध्यमातून पायाभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत मागील टर्म च्या ५ वर्षात १५७ मेडिकल कॉलेज देशात सुरू करण्यात आले असून मागील वर्षी ७५ कॉलेज मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. तसेच आकांक्षीत जिल्ह्यामध्ये तथा आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक आरोग्याच्या सोयी-सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र स्तरावर सुरू असून लवकरच तंत्रज्ञान युक्त अद्ययावत रुग्णालये निर्माण होतील, असेही त्यांनी यावेळी लोकसभेत सांगितले.





