
गडचिरोली दि 24 मार्च :::आलापल्ली गावाच्या अगदी जवळ अहेरी आणि सिरोंचा कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला आज सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना नक्षलवाद्यांनी बांधलेले बॅनर-पत्रके आढळून आल्यानंतर या भागात नक्षली दहशत पुन्हा एकदा वाढली आहे. या बॅनर-पत्रकांमुळे नक्षली अहेरी भागात सक्रिय झाले असल्याचे स्पष्ट होते. ऊल्लेखनीय आहे की कालच गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चारनक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची घोषणा केली. तत्पूूर्वी मागिल आठवड्यात एटापल्ली तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रांतर्गत छगच्या सीमेत शिरून नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना ऊध्वस्त केला. यापार्श्वभूमिवर संतप्त नक्षल्यांनी पोलीसांना चेतावनी देण्याच्या इराद्याने असे बॅनर बांधुन पत्रके टाकली असल्याचा कयास लावला जात आहे.
या बॅनर-पत्रकांमध्ये पोलिस दल C-60 कडून नक्षल शोध अभियानाच्या नावावर आदिवासींना त्रास देणे बंद करा, खोटे शोध अभियान राबवून आदिवासींच्या जल-जंगल- जमिनीवर अतिक्रमण बंद करा, आदिवासींची घरे-शेतशिवार जाळू नका, अन्यथा वाईट परिणाम होतील असा दिला इशारा दिला आहे. दुसऱ्या एका छापील पत्रकात कोरोना काळात जवानांना सरकार मुद्दाम जंगलात नक्षल शोध अभियानासाठी पाठवत असुन, जवानांनी या साठी नकार द्यावा असे केले आवाहन केले आहे.
सकाळी ही माहिती वाऱ्यासारखी अहेरी आलापल्लीत पसरली प्राणहिता पोलीस जिल्हा ऊपमुख्यालयातून तात्काळ घटनास्थळावर श्वानपथक, बीडीडीएसची चमु व सी-60 दलांनी जाऊन सुरक्षेच्या ऊचित ऊपाययोजनांसह कारवाई सुरू केली आहे.
विशेष बाब अशी की मागिल आठवड्यात छत्तीसगढ़ भागातील नक्षली प्रवक्ता विकल्प याने सरकारकडे अटीसह शांतीवार्तेचा प्रस्ताव दिला होता. मात्र हिंसक कारवाया त्यांनी थांबविल्या नाहीत. काल सायंकाळी नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलीसांची बस आइईडीचा विस्फोट करून ऊडविली. त्यात 5 जवान शहीद तर 10 पेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत. हे लक्षात घेता नक्षल्यांचे मनसुबे हिंसा
सोडण्याचे नाहीत हे स्पष्ट होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांची शक्ति क्षीण झाली असल्याचा दावा पोलीस करीत आहेत. मात्र आलापल्लीच्या वर्दळीच्या ठिकाणी जे प्राणहिता ऊपपोलीस मुख्यालयापासुन केवळ दोन तीन किमी अंतरावर बॅनर-पत्रकांद्वारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, त्यांच्या हिंसक कारवाया पुन्हा वाढताहेत काय? असा प्रश्न सहाजिकच उपस्थित होतो.





