अमरावती,दि.२६:: जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अमरावती पोलीसांनी आज नागपुरातून अटक केली. दक्षिणेतील कर्नाटक या त्यांच्या मुळगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांना नागपुर रेल्वे स्थानकावरून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. गुरूवारी ही घटना घडल्यानंतर शिवकुमार हे शुक्रवारी नागपुर रेल्वे स्टेशनवरून कर्नाटक कडे जाणार्या रेल्वे गाडीत बसत असताना पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. शिवकुमार यांना घेऊन पोलीस आता अमरावतीच्या दिशेने निघाले आहेत. त्यांना आधी अमरावती येथे आणि नंतर धारणी येथे नेण्यात येईल. शिवकुमार यांच्या वरिष्ठांची देखील गरज भासल्यास चौकशी केली जाईल असे अमरावतीचे पोलीस अधीक्षक डॉ हरीबालाजी एन यांनी सांगितले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत येणाऱ्या हरीसाल येथील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरूवारी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोट मध्ये काही वरीष्ठ अधिकार्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या अनुषंगानेच उपवनसंरक्षक शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी करून आणखी काही वरिष्ठ अधिकारी दोषी आहेत का हे तपासून पुढील कारवाई करण्यात येईल असे अमरावतीचे पोलीस अधीक्षक डॉ हरीबालाजी एन यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या शिवकुमार यांना अमरावतीच्या न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे. अत्यंत धाडसी स्वभावाच्या चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दीपाली चव्हाण आपल्या आईसोबत मेळघाटात राहात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चव्हाण यांनी आईला गाडी करून देऊन बाहेरगावी पाठवले. गावाला गेल्यानंतर आईने फोन केला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. म्हणून त्यांच्या आईने हरिसाल येथे शेजारील गार्डशी संपर्क साधून घरी जाऊन पाहायला सांगितले. गार्डने घरी जाऊन पाहिले असता त्या घरात पडलेल्या आढळल्या. त्यांच्या शेजारी पिस्तुल पडलेले होते. चव्हाण यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा गावकर्यांमध्ये होती. चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
दीपाली चव्हाण या धाडसी अधिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या कार्यकाळात हरिसाल येथे पर्यटन विकसित झाले. दोन गावांचे पुनर्वसनही केले. मांगीया गावाच्या पुनर्वसनात काही गावकरी तिथून गेले नाही. त्यापैकी काहींनी त्यांच्या विरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा त्यांनी धीराने सामना केला होता.