
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 80 वर्षांच्या पवारांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांनी केली आहे. मलिक म्हणाले की – ‘रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याची माहिती मिळाली आहे. एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम सलग त्यांची तपासणी करत आहेत. शरद पवार साहेब लवकरच बरे होऊन घरी येतील अशी आशा आहे.’
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले की शरद पवार हे रक्त पातळ करणार्या औषधांवर होते, परंतु आता हे औषध थांबवले जात आहे. ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिवाय 31 मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल. पुढील सूचना होईपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
सुप्रिया सुळेंनीही दिली पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती
खासदार सुप्रिया सुळे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, बाबांना पित्ताशयाचा त्रास होत असल्याने त्याकडे तातडीने लक्ष देऊन उपचार करणे गरजेचे आहे. म्हणूनच त्यांना बुधवार 31 मार्चला10 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. त्यानंतर ते घरीच विश्रांती घेतील. त्यामुळे त्यांचे आजपासून सुरु होणारे नियोजित कार्यक्रम आणि दौरे पुढील 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात येणार आहेत.





