खून करणार्‍या नक्षल्यास जन्मठेप

0
22

गडचिरोली-पोलिस खबर्‍या असल्याच्या संशयावर इसमाचा खून करणार्‍या नक्षल आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व १५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. चंद्रीका उर्फ रंजीत पेठूराम राऊत (५0) रा. घोटसूर ता. एटापल्ली असे आरोपी चे नाव आहे.
आरोपी चंद्रका राऊत व त्यांचे इतर नक्षल साथीदारासह ६ ऑगस्ट २00९ ला रात्री ११ वाजता मृतक वासुदेव कारू नरोटे रा. भिमपूर ता. धानोरा हा आपल्या घरी झोपला असताना बंदुकधारी नक्षल्यांनी झोपेतून उठवून गावातील चौकात नेले नक्षलवादी दिवाकर, इंदिरक्का, जगदीश, रंजीत व इतर १00 ते १५0 बंदुकधारी नक्षलवादी जमलेले होते. तु पोलिस खबर्‍या आहेत, आमची माहिती पोलिसांना देतोस असे म्हणून गावातील नागरिकांसमोर वासुदेव नरोटे यांच्या गळय़ावर धारधार शस्त्राने वार करून खून केला, असे फियादीच्या तक्रारीवरून ७ ऑगस्ट २00९ रोजी पोमके गट्टा येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोउपनि गजानन घाडगे यांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने फिर्यादी व साक्षीदारांचे बयाण व सरकारी वकिलांचा युक्तावाद ग्राह्य धरून न्यायाधीश -३ बी. एम. पाटील यांनी आज ३१ मार्च रोजी आरोपीस जन्मठेप व १५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एन.एम. भांडेकर व एस. यु. कुंभारे यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून पोनि श्याम गव्हाणे, पोउपनि नारायण बच्चलवार तसेच पोना अरविंद पेंदाम यांनी काम पाहिले.