
गोंदिया,दि.7 : तस्करांना दारूची वाहतूक करणे रेल्वे मार्गाने सुगम ठरत आहे, मात्र अशा तस्करांना पकडण्यासाठी रेल्वे पोलीस दल सुद्धा कंबर कसून आहे. विशेष अभियान चालवून त्यांच्या योजना अपयशी केल्या जात आहेत. जन शताब्दी ट्रेनमधून दारूची तस्करी करणार्या एका इसमाला रेल्वे सुरक्षा दलाने पकडले.
5 एप्रिलच्या दुपारी 2.40 वाजता आरपीएफ नागपुर मंडळाचे सुरक्षा आयुक्त पंकज चुघ व सहायक सुरक्षा आयुक्त एस.डी. देशपांडे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाचे प्रभारी निरीक्षक नंदबहादुर, उपनिरीक्षक मयंक मिश्रा, मुख्य आरक्षक राजेंद्र रायकवार, पी. दलाई व आरक्षक नासिर खान यांच्या चमू रेल्वे परिसरात विशेष अभियानांतर्गत तैनात होती. दरम्यान रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर उभ्या असलेल्या जन शताब्दी एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक 13 जवळ एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला. पोलीस चमूने चौकशी केल्यावर त्याने आपले नाव रोहित अग्रवाल (वय 38) रा. रायपुरा, पो.रायपूर छत्तीसगड) असे सांगितले.त्याच्या जवळील दोन्ही बॅग व पिशवीची झळती घेण्यात आली. त्यावेळी त्यात 180 मिलीने भरलेले देशी दारूचे 70 पव्वे आढळले. सदर आरोपी अवैधरित्या रेल्वे मार्गाने दारूची तस्करी करीत होता. त्याला शासकीय रेल्वे पोलीस गोंदियाच्या सुपूर्द करण्यात आले. त्याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (अ), 65 (ई), 66 (1) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.





