43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News चंद्रपूर जिल्ह्यात दोन बिबट्यांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात दोन बिबट्यांचा मृत्यू

0
38

blank

चंद्रपूर-जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र चकपिरंजी लगतच्या बोथली शेतशिवारात नर तर, चंद्रपूर परिक्षेत्रातील दुर्गापूर नियतक्षेत्रातील पायली-भटाळी लगत मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. या घटना शुक्रवार, 9 एप्रिल रोजी उघडकीस आल्या. बोथली शेतशिवारात वनरक्षक व्ही. जी. चौधरी गस्तीवर असताना गट क्रमांक 211 मध्ये बिबट मृतावस्थेत दिसला. याबाबतची माहिती त्यांनी वरिष्ठ वनाधिकार्‍यांना दिली. माहिती मिळताच एस. एल. लखमावाड, मूल पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी जांभुळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ. कुंदन पोहचलवार, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर, वन्यजीवप्रेमी उमेशसिंह झिरे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. मृत बिबट्याची तपासणी केली असता, बिबट नर असून, त्याचे वय अंदाज 8 वर्षे असल्याचे वनाधिकार्‍यांनी सांगितले.
मृत बिबट्याचे नखे, मिशा, दात सर्व शाबुत आहेत. उत्तरीय तपासणीदरम्यान, शरीर कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नसल्याचे पशुधन विकास अधिकारी यांच्या चमुने सांगितले. दुसरी घटना दुर्गापूर उपक्षेत्रातील पायली-भटाळी मधील कक्ष क्रमांक 880 मध्ये वनकर्मचारी गस्तीवर असताना मादी बिबट मृतावस्थेत आढळून आला. माहिती मिळताच विभागीय वनाधिकारी एस. व्ही. जगताप, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बावणे यांनी केली. या बिबट्याचा मृत्यू झुंजीत झाल्याची माहिती वनविभागाने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

blank