
अर्जुनी मोरगाव,-देशात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने 30 एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व स्थापना बंद केल्या आहेत.राज्यात दारूविक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे.दारूबंदी आदेश असतांना अवैध दारू विक्री प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देशात सर्वत्र कोरोना महामारी चा थैमान सुरू आहे. या विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून शासन विविध उपाययोजना करीत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व स्थापना बंद आहेत.प्रशासनाने दारूबंदी आदेश लागू केला आहे.तरीही काही असामाजिक तत्वांकडून अनेक ठिकाणी अवैध दारू बाळगून विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात अर्जुनी मोरगावचे ठाणेदार महादेव तोदले यांचे नेतृत्वात दारूबंदी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत अवैध दारू विक्री करणाऱ्या चार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंभीटोला येथील श्याम किशोर हिरालाल मोहबते (65) याचेकडून 40 नग देशी दारू किंमत 1200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महागाव येथील राजू मानसिंग पवार (28) यांच्याकडून 74 नग देशी दारू किंमत 1924 रुपये,धाबेटेकडी येथील आकाश शंकर मेश्राम (26) व राहुल किशोर जांभुळकर (24) या दोघांकडून 21 नग देशी दारू किंमत 630 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.चारही आरोपितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.ठाणेदार महादेव तोदले यांचे मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.




