
पवनी- पवनी शहरात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असतांना ग्रामीण भागातील खबर्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाठलाग करून दारू तस्करी करणार्या दुचाकीस्वाराला पवनी पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवराज चिनकम वेरपुरी असे आरोपीचे नाव असून तो बंगाली कॅम्प चंद्रपूर येथील राहणारा आहे.
पवनी पोलिसांना अवैध दारू तस्करीची कुणकुण लागल्यामुळे ठाणेदार जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी सापळा रचत कोदूरली गावात ठिय्या मांडला. दरम्यान, एका दुचाकीस्वारास थांबविले. चौकशीसाठी पुढे येत असण्याची चाहूल लागताच दुचाकीस्वाराने पळ काढल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपी दुचाकीस्वारास कोदूरली येथील गोसेखुर्द कालव्याच्या पुलाजवळ पकडण्यात आले. चौकशीअंती तो चालवीत असलेल्या दुचाकीमध्ये देशी दारूचे पव्वे असल्याची माहिती मिळाल्याने मुद्देमालासह पोलिस स्टेशनमध्ये रवानगी करण्यात आली.
पोलिसांनी आरोपी शिवराज चिनकम वेरपुरी याचेकडून पकडण्यात आलेल्या दुचाकी क्र. एम. एच.३४ ए एन ३७३५ या दुचाकीतून काळ्या बॅगमध्ये १00, कापडी हिरव्या रंगाच्या बॅगमध्ये १00, प्लॅस्टिक चुंगळीमध्ये १00 तर पेट्रोल टॅकमध्ये १00 तसेच सीटखाली १00 पव्वे असे मिळून ५00 पव्वे सापडले असून किंमत रुपये १३ हजार ५00 एवढी आहे. तसेच २0 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.
पकडण्यात आलेल्या दारूचा बॅच नं. १८६ एप्रिल २0२१ असून कोणत्या दुकानातील आहे याची मौखिक माहिती पत्रकारांसमोर आरोपीने दिल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे, पोलिस उपनिरीक्षक निलेश भेलावे, पोलिस हवालदार गंगाधर नागरिकर, पोलिस नायक अनिल कळपते, संतोष लांजेवार, विनोद आरिकर, सुप्रिया कान्हेकर यांनी केली आहे. पुढील तपस एपीआय शंकर पांगारे करीत आहेत.





