
तिरोडा- तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दि. ०४ एप्रिल २०२१ पासुन कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले. त्यावेळची परिस्थिती बघता व आरोग्य यंत्रणेवर पडत असलेल्या ताणामुळे व कर्मचारांच्या अभावामुळे सदर रुग्णालयात इतर रुग्णाकरिता (NON-COVID) सुरु असलेल्या इतर रुग्णसुविधा बंद करण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असून तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये वर्तमानात 5-6 रुग्ण उपचार घेत आहेत. व त्यांच्यासाठी 8 डॉक्टर व 20 नर्स इत्यादी आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. व जवळपास तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती सामान्य होत चाललेली आहे.
परंतु जवळपास दीड महिन्यांचा कालावधी लोटला असून तालुक्यातील नागरिकांना देण्यात येत असलेल्या सुविधा जसे की, गरोदर महिलांची तपासणी, सोनोग्राफी, प्रसूती, सीजर, दैनिक ओपीडी, आंतर रुग्ण सेवा आदि सर्वआरोग्य सेवा बंद असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होत असून त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याविषयीचा एकप्रकारे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे बंद असलेल्या इतर रुग्णसेवा सुरू करण्याबाबदची मागणी मा. रविकांत बोपचे यांनी निवेदनाद्वारे खासदार प्रफुलभाई पटेल,उपसंचालक नागपूर,जिल्हाधिकारी गोंदिया,जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया यांच्याकडे केलेली आहे.





