
सालेकसा,दि.01ः सालेकसा तालुका हा आदिवासी बहुल व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. तालुक्यात शेतकरी वर्गाची संख्या अधिक असल्याने शेतकऱ्यांना सातत्याने तलाठी कार्यालयांची अनेक कामांसाठी भेट घ्यावी लागते. तलाठ्यांच्या कार्यालयातील सातत्याने गैरहजेरीमुळे शेतकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तालुक्यातील बरीच तलाठी कार्यालये कोतवालांच्या भरोसे चालतात तर काही काही कार्यालये महिनो-महिने कुलूप बंदच असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारे व इतर कागदपत्रांसाठी चक्रा मारावे लागतात. ही बाब लक्षात घेता मानसून कालावधी 2021, कोवीड 19 आणि इतर महत्वाचे धान खरेदी अनुषंगिक बाबी लक्षात घेता सालेकसा तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी त्यांच्या मुख्यालयी हजर राहून कामे करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी त्यांच्या मुख्यालयी राहून राहात असलेल्या घरमालकाचे संमतीपत्र कार्यालयास सादर करावे व चौकशीअंती कार्यालयात गैरहजर आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे तलाठी व मंडळ अधिकारी यांना तहसीलदारांनी 25 मे रोजी नोटीस बजावले.
मात्र त्याचा परिणाम काहीही झाल्याचे दिसून येत नाही. उलट तहसीलदारांच्या या आदेशाला ठेंगा दाखवीत कार्यालये कुलूपबंद ठेवीत असतात. याकडे तहसीलदारांनी लक्ष देऊन तलाठ्याने वर कारवाई करायला हवी असे सर्वत्र एकच मागणी केली जात आहे. तालुक्यातील बरेच कर्मचारी अधिकारी कार्यालयांना बुट्टी मारून साहेबगिरीचा दरारा निर्माण करीत आहेत तसेच मागील कित्येक वर्षापासून अधिकारी कर्मचाऱ्यांना अपन डाऊनचा आजारच लागला आहे. सध्या सर्वत्र रब्बी पीक निघून शेतकरी धान विकण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे सातबारायांसाठी तलाठी कार्यालयाकडे धाव घ्यावी लागते मात्र सातत्याने तलाठी कार्यालयांमध्ये तलाठ्यांची अनुपस्थिती व कार्यालय कुलूप बंद यामुळे शेतकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो याकडे जनप्रतिनिधी व तहसीलदार यांनी लक्ष केंद्रीत करणे अत्यंत गरजेचे आहे.