
देवरी,दि.18 – पर्यावरणाचा समतोल राखत शत्रूकिडीवर जैविक पद्धतीने मात करण्यासाठी निंबोळी हे भातशेतीला वरदान ठरेल, असे प्रतिपादन देवरीचे तालुका कृषी अधिकारी घनशाम तोडसाम यांनी आज देवरी येथे आयोजित एका शेतकरी प्रशिक्षणात केले.
रासायनिक खतांसह रासायनिक औषधांचा अत्याधिक वापर होत असल्याने शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. याशिवाय मातीचा दर्जा आणि पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस खालावत चालला आहे. यामुळे शेतीसाठी उपयुक्त असलेल्या मित्र किडी आणि उपयुक्त व जीवाणूंचे अस्तित्व सुद्धा संपुष्टात आले आहे. एवढेच नाही तर रासायनिक खत व औषधे यांचा प्रमाणाबाहेर वापर केल्याने विषाक्त अन्न निर्मिती होत असल्याने त्याचा मानवी जीवनावर सुद्धा विपरित परिणाम झाल्याचे दिसून येते
सतत रासायनिक खतांचा वापर होत असल्याने शत्रूकिडीची प्रतिकार शक्ती वाढल्याने आता या किटकनाशकांचा प्रभाव सुद्धा कमी झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये सेद्रीय पद्धतीने शेती करणे काळाची गरज आहे. यासाठी आपल्या परिसरात आढळणाऱ्या आणि शेळी वा इतर जनावरे खात नसलेल्या कोणतीही 10 वनस्पस्तीची पाने गोळा करून त्याचा दशपर्णी अर्क काढून त्याचा कीड नाशक म्हणून वापर करावा. यात कडूलिंब ५ किलो, करंड २ किलो, रुच्कीन २ किलो, एरंडी २ किलो,क णेर २ किलो, गराडी २ किलो, पपई २ किलो, गुळवेल २ किलो, गारवेल २ किलो असा चुरा करून 200 लिटर पाण्यामध्ये आंबवावे. यात 5 किलो गोमुत्र आणि 5 किलो शेतखत मिसळवणे. 30 दिवसानेतर या द्रावणाचे गाळण करून प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये अडीचलिटर प्रमाणे दर पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी केल्यास कीडींवर नियंत्रण करता येत असल्याचे श्री तोडसाम यांनी सांगितले.
या प्रशिक्षणाला चिचगडचे मंडळ अधिकारी चंद्रकांत कोळी, देवरीचे विकास कुंभारे, कृषी सहायक डी एम गौतम, माया येरणे, जी एस पांडे, फिरोज कापगते, शिवकुमारगेडाम, मनोहर जमदाळ,सलामे, सावलकर, पारधी, कोल्हे, धानगाये, हरदुले, कडव, गावळ, कोरे, हुळे, डोंगरवार, पाथोडे, कापगते, धानगाये आदी कर्मचारी उपस्थित होते.
संचलन देवेंद्र पारधी यांनी तर उपस्थितांचे आभार मनोहर कोल्हे यांनी मानले. प्रशिक्षणाला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





