35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ ‘एचआरसीटी स्कोर’ २४ असलेला रामेश्वर शासकीय कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे कोरोनामुक्त

‘एचआरसीटी स्कोर’ २४ असलेला रामेश्वर शासकीय कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे कोरोनामुक्त

0
61

blank

  • नातेवाईकांनी मानले डॉक्टरांचे आभार

वाशिम, दि. २० : ‘एचआरसीटी स्कोर’ २४ असूनही जिल्हा शासकीय कोविड रुग्णालयामधील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे पारवा (ता. मानोरा) येथील रामेश्वर राधाकिसन चव्हाण हा युवक कोरोनामुक्त झाला. एक महिन्यांनंतर त्याला १९ जून रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून रामेश्वरला कोरोनामुक्त केल्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले.

मानोरा तालुक्यातील पारवा येथील रामेश्वर चव्हाण या ३३ वर्षीय युवकाला कोरोना संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने विविध तपासण्या केल्या. यामध्ये त्याला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले, तसेच त्याचा एचआरसीटी स्कोर २४ इतका आल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी प्रयत्न सुरु केले. मात्र, वाशिमसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रयत्न करूनही बेड उपलब्ध न झाल्याने त्यांनी रामेश्वरला १५ मे २०२१ रोजी वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालय येथील जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्याच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी (एसपीओटू) सुमारे ५० च्या आसपास होती.

कोविड रुग्णालयात दाखल झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. राम हजारे यांच्या चमूने रामेश्वरवर उपचार सुरु केले. त्याला सुरुवातीला हायफ्लो ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. मात्र, त्याची तब्येत खालावल्याने व्हेंटीलेटरच्या सहाय्याने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. जवळपास १५ दिवस त्याच्यावर व्हेंटीलेटरच्या सहाय्याने उपचार सुरु होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हजारे यांच्या चमूने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रामेश्वरचा कोरोना चाचणी अहवाल ३० मे रोजी ‘निगेटिव्ह’ आला. तो कोरोनामुक्त झाला, मात्र रुग्णालयात दाखल होण्यास विलंब झाल्याने फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होवून त्याच्या फुफ्फुसाची हानी झाली होती. त्यामुळे कोरोनामुक्त होवूनही त्याच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढण्याची गती कमी होती. डॉक्टरांनी कृत्रिम ऑक्सिजनच्या सहाय्याने उपचार केल्याने त्याच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी हळूहळू ९२ पर्यंत वाढण्यास मदत झाली. त्यानंतर त्याला १९ जून रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रामेश्वर उपचार करणारे डॉ. राम हजारे यांनी सांगितले की, रामेश्वर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्यांची तब्येत खूपच गंभीर झाली होती. त्यामुळे आम्ही तातडीने उपचार सुरु केले, त्यांना सतत निगराणीखाली ठेवून त्यांच्या तब्येतील बदल लक्षात घेवून उपचारात बदल केले. सुमारे १५ दिवस व्हेंटीलेटरवर ठेवून तसेच त्यानंतर पुन्हा कृत्रिम ऑक्सिजन देवून त्यांच्या फुफ्फुसासातील संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अखेर आमच्या प्रयत्नांना यश येवून रामेश्वर यांनी कोरोनावर मात केली व त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा कोविड रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेवून आमच्या रुग्णाला कोरोनामुक्त केले. आमच्या रुग्णाला चांगली आरोग्य सुविधा दिली, या सर्वांचे आम्ही आभार मानतो, अशा शब्दात रामेश्वर चव्हाण याच्या पत्नी सौ. उज्ज्वला चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रुग्णाचे नातेवाईक रामेश्वर पवार म्हणाले, आमच्या रुग्णाचा एचआरसीटी स्कोर २४ असल्याने सुरुवातीला आम्ही आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये बेड मिळविण्यासाठी संपर्क केला. मात्र, सर्वत्र नकार मिळाला. अखेर आम्ही त्याला जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. येथील डॉक्टर व आरोग्य अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे उपचार करून आमच्या रुग्णाला कोरोनामुक्त केले आहे. त्याला आता डिस्चार्ज मिळाला आहे.

रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफचे कार्य कौतुकास्पद :  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड

जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झालेले रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल होत होते. त्यांना वाचविताना डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तरीही काही रुग्णांचा मृत्यू झाला, याचे आम्हाला दुःख आहे. मात्र, रामेश्वर सारख्या अनेक गंभीर रुग्णांचा जीव आम्ही वाचवू शकलो. या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.

blank