34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ घर बांधून देण्याच्या नावाखाली गृहनिर्माण संस्थेनेच हडप केले कर्मचार्‍यांचे गृहकर्ज

घर बांधून देण्याच्या नावाखाली गृहनिर्माण संस्थेनेच हडप केले कर्मचार्‍यांचे गृहकर्ज

0
49

blank

– फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

पुसद- शहरापासून जवळच असलेल्या गायमुखनगर ग्रामपंचायत हद्दीत शेत सर्वे नं. 9/1 मध्ये शासकीय व जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना घराचे बांधकाम करून घरे देण्याच्या नावाखाली झेप गृहनिर्माण संस्थेने अनेक कर्मचार्‍यांच्या नावावर गृहकर्ज उचलून हडप केल्याची तक्रार बबिता अर्जुन राठोड यांनी जिल्हा उपनिबंधक व सहकार विभागाकडे केल्याने पुसद शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत गायमुखनगर हद्दीतील झेप सहकारी गृहनिर्माण संस्थेने शेत सर्वे 9/1 वर 2007 साली शासकीय व जिप कर्मचार्‍यांना घराचे बांधकाम करून घर देण्याच्या नावाखाली परस्पर गृहकर्ज उचलून हडप केले. त्यामुळे या कर्मचार्‍यांना आजपर्यंत घर तर मिळालेच नाही, उलट या कर्मचार्‍यांचे लाखो रुपये या संस्थेने हडप केल्यामुळे त्यांच्या सेवापुस्तकामधून पैसे कटले आहेत. याबाबत दाखल तक्रारीनुसार, अर्जुन रामचंद्र राठोड पुसद वनविभागात वनपाल या पदावर कार्यरत होते. परंतु कर्तव्य बजावीत असताना त्यांचा 15 जुलै 2015 रोजी अचानक मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी बबिता अर्जुन राठोड वारसदार असून त्यांचे नाव सेवापुस्तिकेमध्ये आहे.
अर्जुन राठोड यांना महाराष्ट्र शासन सहकार पणन वस्त्रद्योग विभाग यांच्याकडून शासन निर्णय 18 जून 2007 रोजी 3,37,500 रुपये गृहकर्ज मंजूर झाले होते. त्या यादीतील 51 सभासदांमध्ये बबिता अर्जुन राठोड यांच्या पतीचे नाव क‘मांक 33 वर होते. पतीच्या मृत्यूनंतर वारसदार यांना 5,07,300 रुपये वारसदार म्हणून बबिता यांना मिळणार होती. परंतु या रकमेतून 2,36,250 रुपये गृहकर्जाची रक्कम परस्पर झेप गृहनिर्माण संस्थेच्या खात्यात वळती केली गेली. परंतु मी वारसदार या नात्याने या झेप गृहनिर्माणने आजपर्यंत मला घर उपलब्ध करून दिलेले नाही, तर या यादीमधील कोणत्याही सभासदालासुद्धा घर दिलेले नाही. त्यामुळे ‘झेप’ संस्थेने संपूर्ण सभासदांचीच फसवणूक केली आहे, असा दावा केला आहे.
त्यामुळे संबंधित झेप गृहनिर्माण सहकारी संस्थेची सखोल चौकशी करून मला माझी रक्कम व्याजासह परत द्यावी किंवा घर उपलब्ध करून द्यावे. झेप गृहनिर्माण सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करून तसेच संस्था पदाधिकार्‍यांवर तत्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी बबिता अर्जुन राठोड यांनी केली आहे. अन्यथा, मला लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करावे लागेल, अशी तक्रार 2 जुलै 2021 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व मुख्यमंत्री, सहकार मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या कर्मचार्‍यांचे या संस्थेने पैसे हडप केल्यामुळे पुसद शहरात खळबळ माजली आहे.

blank