कुलसचिव रणजित पाटील यांच्याविरुध्द राजभवनाद्वारे कारवाईचे आदेश

0
26

नांदेड:–वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव रणजित अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःच्या वेतनापोटी परस्परच केलेल्या व उचललेल्या लाखो रुपयांच्या गैर व्यवहार प्रकरणात राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसेकर यांनी तात्काळ कारवाई करावी, असे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रधानसचिव संतोष कुमार यांनी लेखीपत्राद्वारे बजावले आहे.

माजी आमदार अ‍ॅड.गव्हाणे, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक अजय गव्हाणे,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य लिंबाजीराव भोसले यांनी दि.२३ जून रोजी सकाळी ११ वाजता राजभवनात राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. सुमारे पाऊन तासाच्या या भेटीतून या तीघांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी बेकायदेशीरपणे केलेल्या अनेक गैर व्यवहारांच्या प्रकरणांसह अलिकडील कुलसचिव रणजित पाटील यांच्याही बेकायदा वेतनवाढीस दिलेल्या मान्यतेचा विषय निदर्शनास आणून दिला होता. या प्रकरणात वेतनापोटीची रक्कम एकरकमी शासन तिजोरीत जमा करुन कुलगुरुंसह कुलसचिव पाटील व अन्य साखळीने नामनिराळं होण्याचा प्रकार सुरु केल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले. अनेक प्रश्‍नही या निवेदनाद्वारे उपस्थित केले होते. या सार्‍या प्रश्‍नांची उत्तरे विद्यापीठाद्वारे दिली जात नसल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली होती. या प्रकरणात कुलसचिव पाटील यांच्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करावेत, नोकरीतून बडतर्फ करावे. तसेच या साखळीतील कुलगुरुंसह अन्य अधिकार्यांविरुध्दही चौकशी करीत कारवाई करावी, अशी मागणी केली होती. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. निवेदनास जोडलेल्या पुराव्यांसह कागदपत्रांची पाहणी केली. या प्रकरणात आपण गांभीर्याने लक्ष घालू, संबंधित दोषींविरुध्द कठोर भूमिका घेवू, असे आश्‍वासन दिले होते. राज्यपालांच्या सूचनेप्रमाणे प्रधानसचिव संतोष कुमार यांनी गृह निर्माण विभागाचे प्रधान सचिव म्हैसेकर यांना लेखी पत्राद्वारे कारवाई आदेश दिले आहेत. वादग्रस्त रणजित पाटील हे गृहनिर्माण विभागातूनच कुलसचिव म्हणून कृषि विद्यापीठात प्रतिनियुक्तीने नियुक्तीवर गेले होते….