जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता- असीम सरोदे

0
37

पुणे | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे. रात्री गिरीश चौधरींची ईडीकडून कसून चौकशी केल्यानंर त्यांना अटक करण्यात आली.

ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती. यावर एकनाथ खडसे यांच्याविरोधात केस लढवत असलेले अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिलीये.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे, असं मत अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.

भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. या प्रकरणाची जी उपलब्ध कागदपत्रं आहेत, त्यानुसार प्रथमदर्शी खडसे हे यात पूर्णतः दोषी असल्याचं अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय.