
मुंबई | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे. मंगळवारी रात्री गिरीश चौधरींची ईडीकडून कसून चौकशी केल्यानंर त्यांना अटक करण्यात आली. ईडीच्या या कारवाईनंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर टीका केली जात आहे.
एकनाथ खडसे यांना अँटी करप्शन ब्युरो व झोटींग आयोग चौकशीनंतर फडणवीस सरकारने क्लीन चिट दिली होती. पण खडसेंनी पक्ष बदलला आणि त्यांची मोदी सरकारने ईडी चौकशी लावली व एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केली. वाझेची नियुक्ती कोणी केली याची चौकशी सीबीआयला हवी आहे. मग फडणवीस यांची प्रकरण दडपण्यासाठी ईडीने चौकशी का करु नये?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जमीन खडसेंच्या पत्नी आणि जावई यांनी अब्बास उकानी या व्यक्तींकडून 3 कोटी 75 लाख रूपयांना खरेदी केली होती. सदरील जमिनीचे 37 लाख एवढे मुद्रांक शुल्कही भरण्यात आले होते. सर्व प्रक्रियेनंतर ही जमिन भोसरी एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं पुढे आलं होतं.
दरम्यान, माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. तर दुसरीकडे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर आहेत. तर काही दिवसांपुर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची देखील ईडी चौकशी करण्यात आली होती.