जिल्ह्यात रब्बी धान साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध शेतकऱ्यांनी काळजी करु नये – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

0
37

गोंदिया,दि.7 : गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ भंडारा
तसेच जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांचेकडून शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येत आहे. 6 जुलै पावेतो
प्रादेशिक व्यवस्थापक भंडारा यांनी 4,04,851.63 क्विंटल धानाची खरेदी केली आहे. तसेच जिल्हा पणन अधिकारी
गोंदिया यांनी 17,11,484.09 क्विंटल धानाची खरेदी केली आहे. जिल्ह्यामध्ये दोन्ही यंत्रणानी मिळून सुमारे 28.55
लाख क्विंटल इतकी धान खरेदी अपेक्षीत आहे.
आज 7 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेतली असता प्रादेशिक व्यवस्थापक भंडारा तसेच
जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांनी जिल्हाधिकारी यांना संपूर्ण आकडेवारीनिशी निदर्शनास आणून दिले की,
धानाचे खरेदीकरीता गोंदिया जिल्ह्यामध्ये जागेची कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
बैठकीस प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती एल.एम.फलके, जिल्हा पणन अधिकारी बी.आर.पाटील,
सहाय्यक जिल्हा पणन अधिकारी ए.के.बिसने, प्रादेशिक व्यवस्थापक भंडारा यांचे प्रतिनिधी जी.एम.सावळे व
नवेगावबांध येथील उप प्रादेशिक व्यवस्थापक उपस्थित होते.
आज रोजी जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांचेकडे 4.75 लाख क्विंटल धान साठवणुकीकरीता जागा उपलब्ध
आहे. तसेच जिल्ह्यामध्ये दिवसाला 40 ते 50 हजार क्विंटल धानाची भरडाई दररोज होते. पुढील दहा दिवसाचा
अंदाज विचारात घेता या माध्यमातून देखील सुमारे 4 लाख ते 5 लाख क्विंटल धान साठवणुकीकरीता जागा उपलब्ध
होणार आहे. तसेच भविष्यात देखील आणखी जागा उपलब्ध होणार आहे. या सर्व बाबी विचारात घेता गोंदिया
जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाचे खरेदी केलेले धान साठवणुकीकरीता कोणतीही अडचण होणार नाही असे आश्वासन
प्रादेशिक व्यवस्थापक भंडारा आणि जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिलेले आहे.
गोंदिया जिल्ह्यात प्रादेशिक व्यवस्थापक भंडारा यांना 211 शासकीय इमारती तसेच जिल्हा पणन अधिकारी
गोंदिया यांना 108 शासकीय इमारती धान साठवणुकीकरीता उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. यापैकी बहूसंख्य
इमारती हया शाळा असल्यामुळे या इमारतींचा कमीत-कमी वापर करावा व शाळा सुरु होण्यापूर्वी या इमारती
शाळेकरीता रिकाम्या करण्यात याव्या असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री खवले यांनी बैठकीमध्ये दिले.
गोंदिया जिल्ह्यात उर्वरीत असलेली रब्बी धानाची खरेदी आणि सद्यस्थितीमध्ये उपलब्ध असलेली जागा तसेच
दररोज होणारी भरडाई विचारात घेता उपलब्ध होणारी जागा विचारात घेवून रब्बी हंगामाचे धान
साठवणुकीकरीता कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याबाबत कोणतीही
काळजी करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.