
मुंबई-शैक्षणिक वर्ष २0२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्यात इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, विद्यार्थी शाळेत येण्यासाठी बॅक टू स्कूल मोहीम राबवण्याची सूचना करण्यात आली आहे. गावस्तरावर समिती स्थापना करणे आवश्यक असून, शाळेत येणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी देखील आवश्यक असणार आहे.
यासंदर्भात काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकात म्हटले आहे की, १५ जुलै २0२१ पासून राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ग्रामपंचायतींनी ठराव करून खालील निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा. तसेच, ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती गठीत करावी. समितीचे अध्यक्ष हे सरपंच असतील, सदस्यांमध्ये तलाठी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्यध्यापक व केंद्रप्रमुख यांचा समावेश, निमंत्रित सदस्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी, सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवक असतील.
विद्यार्थ्यांना टप्प्याटप्पाने, वेगवेगळ्या वेळी शाळेत बोलवण्यात येणार आहे. शाळेत शिकवताना महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दोन बाकांमध्ये 6 फुटांचं अंतर ठेऊन, एका बाकावर एकच विद्यार्थी असणार आहे. तर एका वर्गात किमाल 20 विद्यार्थीमर्यादा असणार आहे. पालक शिक्षक बैठका फक्त ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. येत्या 15 जुलैपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
दरम्यान, शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करावे, गर्दी टाळण्यासाठी पालकांना शालेय परिसरात प्रवेश देऊ नये, एकही विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्यास तातडीने शाळा बंद करून मुख्याध्यापकांनी निर्जंतुकीकरण करावे, कोरोनाग्रस्त विद्यार्थ्याला क्वारंटाइन करून उपचार सुरू करावेत, अशा सुचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शासकिय स्तरावर योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.