लाखनी,दि.08–शालेय पुस्तके मागण्यावरुन झालेल्या वादात एका तरुणाने जिल्हा परिषद शाळेच्या दोन शिक्षकांना मारहाण केल्याची घटना लाखनी तालुक्यातील सोमलवाडा येथे मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी लाखनी ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
विलास उर्फ कैलाश शंकर बडगे (३७) रा.सोमलवाडा असे आरोपी तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सोमलवाडा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रामकृष्ण गिरीपुंजे आणि सुरेश गिरीपुंजे सेतू कार्यक्रमाविषयी कार्यालयात बसून चर्चा करीत होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास विलास तेथे पुस्तक मागण्यासाठी आला. त्यावरुन वाद झाला. या वादात शिक्षक रामकृष्ण गिरीपुंजे यांची कॉलर पकडून मारहाण केली तसेच शिक्षक सुरेश गिरीपुंजे यांनाही मारहाण केली. याप्रकरणी लाखनी ठाण्यात तक्रार देण्यात आली. शाळेच्या परिसरात वाद सुरु झाल्याने गावकर्यांची मोठी गर्दी झाली होती. गावकर्यांनी समजूतही काढण्याचा प्रयत्न केला परंतु विलास ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा विलास बडगे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक मनोज वाढीवे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक, हवालदार सुभाष राठोड, प्रमोद टेकाम, मुकेश गायधने करीत आहेत. या घटनेने गावात खळबळ उडाली असून या मारहाणीची दिवसभर चर्चा होती.
|