रातुम नागपूर विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ उद्या

0
31

नागपूर- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ शुक्रवार ९ जुलै रोजी सकाळी ११ वा. दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे प्रथमच हा समारंभ आभासी पद्धतीने होत आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.
विद्यापीठाच्या ऑनलाईन दीक्षान्त समारंभाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच सर्वोच्च न्यायालयाचे नवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर प्रामुख्याने उपस्थित राहणार राहणार आहे. या समारंभाला भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद डी. लिट. पदवी प्रदान केली जाणार आहे. याच कार्यक्रमात विद्यापीठाच्या चारही विद्या शाखांमधील एकूण ८६७ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान केली जाणार आहे. हिवाळी व उन्हाळी परीक्षा उत्तीर्ण करणार्‍या ७७ हजार ९१२ विद्यार्थ्यांना स्नातक व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. १0७ प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना १६0 सुवर्णपदके ९ रौप्य पदके, १९ पारितोषिके प्रदान केली जाणार आहे. यावर्षी पीएचडीसाठी आभासी व्हायवा घेण्यात आला. त्यात महाराष्ट्राबाहेरील तसेच विदेशातून विद्यार्थी सहभागी झाले होते. दीक्षान्त समारंभानंतर १२ जुलै रोजी दोन सत्रात पारितोषिकांचे वितरण स्वतंत्ररित्या करण्यात येणार आहे. १३ ते १६ जुलै दरम्यान विद्यापीठ कक्षात पीएचडी पदव्या प्रदान करण्यात येतील. या दीक्षान्त समारोहात डॉ. रत्नाकर भेलकर आणि डॉ. टी. बी. गेडाम यांना स्वतंत्ररित्या डीलिट पदवी देण्यात येणार आहे. प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा नियंत्रक डॉ. प्रफुल्ल साबळे व माध्यम समन्वयक राजेंद्र पाठक पत्रपरिषदेला उपस्थित होते.