जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम, पुलवामामध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान

0
17

श्रीनगर(वृत्तसंस्थाः)– जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी बुधवारी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. दरम्यान, कुलगाम आणि पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी झाल्या. यामध्ये सुरक्षा दलाने 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यापूर्वी मंगळवारी संध्याकाळी सुरक्षा दलाने कुपवाडा जिल्ह्यातील गॅंडर्स भागातील हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ ​​उबैद याला ठार केले होते. अशाप्रकारे गेल्या दोन दिवसांत या खोऱ्यांमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली आहे.

कुलगाममधील जोदार भागात चकमकी
पहिली चकमक ही कुलगाममधील जोदार भागात झाली. सुरक्षा दलाच्या शोधमोहीमेदरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. दरम्यान, प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला असून तो लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुलवामामधील पुचल भागात दुसरी चकमक
सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीवरुन संबंधित भागात शोध मोहीम राबवण्यात आली होती. दरम्यान, दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना ठार केले. सूत्रांच्या माहितीनुसार, या भागात शोध मोहीम सुरु असून अजून काही दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवली जात आहे.