
मुंबई | मागील महिन्याच्या सुरवातीलाच पावसाचं दमदार आगमन झालं होतं. त्यानंतर तब्बल दोन ते तीन आठवडे पावसाने दडी मारली होती. यावेळी राज्यात तापमानात वाढ झाल्याचं जाणवत होतं. 7 जुलै रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला होता. पण अद्याप राज्यात पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचं संकट ओढवलं होतं. पण आता परंतू आता 8 जुलैपासून पावसाने पुन्हा कमबॅक केलं आहे.
अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असून यामुळे गुरुवारपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होईल अशी शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांत पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 10 जुलैपासून राज्यात सर्वत्र पावसाचं वातावरण दिसू शकतं.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळमध्ये गुरूवारी आणि शुक्रवारी चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर संपूर्ण कोकण, कोल्हापूर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नांदेड, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, वाशीम, अकोला या जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असल्यानं सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झालं आहे. मॉन्सूनचा वायव्य भारतातील प्रवास सुरू होणार असून, दिल्लीसह, पंजाब, हरियाना, राजस्थानच्या काही भागांत पावसाला सुरवात झाली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या होत्या. आता पावसाचं पुनरागमन झाल्यानं पेरणीला सुरवात होणार आहे.