
गोरेगाव,दि.08ः उत्पादकता वाढविण्यासाठी आज शेतीत विविध बदल होत आहेत. शेती महागाची ठरत आहे. खर्च जास्त व त्या तुलनेत उत्पन्न कमी अशी अवस्था शेतीची झाली आहे. शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे व शेती फायद्याची व्हावी यासाठी बिजोत्पादन आवश्यक असल्याचे मत बोरकन्हार फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे यांनी व्यक्त केले.
ते बोरकन्हार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या नेतृत्त्वात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गोंदिया येथे आयोजित सभेत बोलत होते. सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी घोरपडे, एमसीडीसी पुणेचे राज्य व्यवस्थापक गणेश जगदाळे, राज्य समन्वयक बाळासाहेब कराडे, विभागीय व्यवस्थापक बेदारकर, संचालक नरेश मेंढे, क्रांतिकुमार बिसेन, व्यंकट बिसेन, कार्यकारी अधिकारी उमेश गौतम उपस्थित होते. सभेमध्ये बोरकन्हार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी शेतकर्यांना राज्य किंवा परराज्यातून ब्रिडर व फाऊंडेशन सिड्स उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच शेतकर्यांना फायदेशीर शेतीद्वारे शेतकरी कसा समृद्ध होईल यावरही उपस्थितांनी मत व्यक्त केले.




